देहूरोडमध्ये ‘ओणम’चा पारंपरिक जल्लोष!

देहूरोडमध्ये ‘ओणम’चा पारंपरिक जल्लोष!
Published on

देहूरोड, ता. २७ : येथील परिसरातील मल्याळी अर्थात केरळवासीयांनी ओणम सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. ओणममधील प्रमुख दिवस असलेल्या तिरुवोणमनिमित्त मल्याळी समाजात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
ओणम हा केरळमधील प्रमुख सण असून, तो राजा महाबली यांच्या स्मृतीशी आणि त्यांच्या समृद्ध व सुखी राज्याच्या लोकपरंपरेशी जोडला जातो. घरांची स्वच्छता, आकर्षक पुक्कळम अर्थात फुलांची रांगोळी, पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजन अशा विविध उपक्रमांमुळे या उत्सवाला विशेष रंगत आली. प्रेम, बंधुभाव, समानता आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा सण म्हणून ओणमकडे पाहिले जाते.
तिरुवोणमच्या दिवशी मल्याळी कुटुंबांमध्ये पारंपरिक ‘ओणसद्य’चे आयोजन करण्यात आले होते. केळीच्या पानावर वाढण्यात आलेल्या या पारंपरिक मेजवानीत विविध भाज्या, सांबार, रसम, अवियल, थोरन, लोणची, पापड, केळीचे पदार्थ तसेच गोडधोड पायसम यांसह विविध पदार्थांचा समावेश होता. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने एकत्र येत या पारंपरिक भोजनाचा आनंद घेतला. महिला आणि पुरुषांनी कसावू साडी व मुंडू यांसह पारंपरिक केरळी पोशाख परिधान केल्याने उत्सवाला विशेष पारंपरिक रंगत लाभली.
दरम्यान, मल्याळी समाजम, देहूरोड यांच्या वतीने ओणमनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला, पुरुष, मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध इनडोअर आणि आउटडोअर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटांतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत ओणमच्या आनंदात भर घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com