Vadivale Bridge
Vadivale BridgeSakal

Kamshet News : वडिवळे पुलाचे काम अर्धवट; भराव गेला वाहून

नवीन पुलाचे काम सुरू करताना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता म्हणून मातीचा भराव करून कच्चा पूल तयार करण्यात आला होता.

कामशेत - कामशेत शहराला ग्रामीण भागातील वडिवळे, बुधवडी, सांगिसे, वळक, नेसावे, खांडशी, उंबरवाडी, वेल्हवळी आदी गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे.

नवीन पुलाचे काम सुरू करताना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता म्हणून मातीचा भराव करून कच्चा पूल तयार करण्यात आला होता. पाऊस सुरू होईपर्यंत हा भराव वाहतुकीस योग्य ठरत होता, परंतु मावळ तालुक्यातील पावसाचा जोर, इंद्रायणी नदीतून होणारा पाण्याचा मोठा विसर्ग यामुळे हा भराव वाहून गेला आहे.

या पुलाची दुरवस्था झालेली असताना देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक याच रस्त्याचा धोकादायक पद्धतीने वापर करत होते. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. नागरिकांना बुधवडी मार्गे मुंढावरे अशा कच्च्या रस्त्याने अन्यथा सुमारे पंधरा-वीस किलोमीटरचा वळसा घालून उंबरवाडीमार्गे गोवित्री-कामशेत असा प्रवास करावा लागणार आहे. यासंदर्भात माहितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वाडुळे येथील पूल निर्माणाधीन

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वाडुळे गावच्या हद्दीमध्ये इंद्रायणी नदीवर ७५ मीटर लांबीचा हा पूल निर्माणाधीन आहे. या पुलाची अंदाजित रक्कम पाच कोटी ८५ लाख ४१ हजार इतकी असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संघ पुणे यांच्याअंतर्गत याचे काम सुरू आहे.

‘सार्वजनिक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वडिवळेचा इंद्रायणी नदीवरील पूल अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे दहा गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे आम्हा दुग्ध व्यवसायिकांसह सामान्यांचे अतोनात हाल होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी.’

- पप्पू शेडगे, दूध उत्पादक, शेतकरी, सांगिसे

‘पुलाचे काम उशिरा सुरू झाल्याने मुदतीत काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने वेगाने करण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. लोकप्रतिनिधींनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन उपाय योजला पाहिजे.’

- नवनाथ राणे, सरपंच, खांडशी-नेसावे

‘नवीन पुलाचे काम चालू आहे. सध्या ते काम प्रगतिपथावर असले तरी अपूर्ण आहे. तसेच तात्पुरता केलेला पूल पाण्याने वाहून गेल्याने गैरसोय झाली आहे. मानसिक व शारीरिक त्रासासह वेळेचे नुकसान होत आहे.’

- अंबादास गर्जे, सहशिक्षक, सांगिसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com