साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यान चोरीला !

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यान चोरीला !

Published on

विकास साळवे ः सकाळ वृत्तसेवा

कासारवाडी, ता. १९ ः जागा आरक्षित नसतानाही भोसरीतील लांडेवाडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान निर्मिती करण्यात आली. हे उद्यान २००७ पर्यंत नागरिकांसाठी खुले होते. मात्र, त्यानंतर हे उद्यान ‘चोरीला’ गेले. सध्या त्याच्या नामफलकाची कमान तेवढी शिल्लक राहिली आहे. मुख्य प्रवेशद्वार बंद आहे. या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करावी तसेच हे उद्यान पुन्हा विकसित करून नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी केली जात आहे.
सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी तत्कालीन महापौर विलास लांडे यांच्या कारकिर्दीत १९९४ मध्ये विविध उद्याने आणि चौकांना महापुरुषांची नावे देण्याचा ठराव सभागृहात मंजूर केला होता. त्यात दिवंगत नगरसेवक प्रल्हाद सुधारे यांच्या सूचनेनुसार लांडेवाडीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यानाचा ठरावही होता. त्यानुसार हे उद्यान विकसित केले. नागरिकांसाठी ते २००७ पर्यंत खुले होते. जुन्या फिनोलेक्स कंपनी लगतच आजही उद्यानाची कमान उभी आहे. पण, उद्यान गायब आहे. महापालिका ठरावानुसार २० क्रमांकावर उद्यानाचे नाव आहे. मात्र, महापालिका विकास योजनेत उद्यानाचे आरक्षण नसल्याचे दिसून येत आहे. मग, त्या जागेवर उद्यानासंदर्भात ठराव करून त्याची उभारणी कशी केली? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

एमआयडीसीची जागा?
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार महापालिका उद्यान व क्रीडा विभागाने कळविले आहे की, या जागेवर महापालिका विकास योजनेतील उद्यानाचे आरक्षण नसून औद्योगिक विकास महामंडळाची मोकळी जागा आहे. पूर्वी हे उद्यान ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत होते. फेररचनेनुसार सद्यस्थितीत हे उद्यान ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येत आहे. या उद्यानाच्या बांधकामविषयीचे अभिलेख ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाकडे हस्तांतरीत केले नसल्याचे म्हटले आहे.

फाईलही गायब?
महापालिका उद्यान विभागाचे सहाय्यक अधीक्षक राजेश वसावे यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले. याबाबत मला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. उद्यानाची फाईलही गायब झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे? हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.

खूप चांगले उद्यान होते. भरपूर खेळणी होत्या. मोठ्या प्रमाणात नागरिक यायचे. आम्ही लहानपणी या उद्यानात खेळायचो. कालांतराने उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार भिंत टाकून कायमचे बंद केले. आता उद्यानच गायब झाले आहे. आता परिसरातील नागरिकांना जवळपास खेळण्यासाठी व आरोग्याच्यादृष्टीने विरंगुळा म्हणून उद्यानच नाही.
- किशोर उदागे, स्थानिक नागरिक, लांडेवाडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यानाची २००७ पर्यंत देखभाल दुरुस्ती उद्यान स्थापत्य विभागाची जबाबदारी होती. परंतु, नंतरच्या कालावधीमध्ये पुढे काय झाले? याबद्दल अधिक सांगता येणार नाही. पण, चौकशी केली जाईल.
- उमेश ढाकणे, सहायक आयुक्त, उद्यान स्थापत्य

लांडेवाडी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यान हे महापालिकेच्या ठरावानुसार मंजूर केले जाते. महापालिकेचा उद्यान स्थापत्य विभाग हे उद्यान बांधून २००७ पर्यंत चालू ठेवते आणि अचानकपणे काहीही न सांगता बंद करते. हा मनमानी प्रकार आहे. त्याची तत्काळ चौकशी झाली पाहिजे. हे उद्यान पूर्ववत सुरू झाले पाहिजे, अन्यथा संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- संजय ठोंबे, अध्यक्ष, वंचित बहुजन, जनरल कामगार युनियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com