
मावळात पुन्हा भिर्रर्र…
लोणावळा, ता. ७ : वाकसई येथे वनोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात आठ वर्षांच्या बंदीनंतर बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवता आला. शेकडोंच्या संख्येने बैलगाडा सहभागी झाले होते. गोपाळ हरिभाऊ मावकर, अतुल शिवराम येवले, यशवंत ज्ञानोबा ढाकोळ, आर्वी अंकुश वाघिरे, विजय गायकवाड, दिलीप देवकर, ऋषिकेश सातकर तसेच श्रीरंग पडवळ यांच्या बैलगाड्यांनी अंतिम फेरीत बाजी मारली.
माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, माजी सरपंच भरत येवले, अमोल केदारी, किशोर जगताप, मनोज जगताप, मारुती भरत येवले, सुनील येवले, अमोल येवले, यशवंत येवले आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाच्या आदेशानुसार आठ वर्षांनंतर उठली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शर्यतींचे आयोजन केले जात आहे. शर्यतींना परवानगी मिळाल्याने गावोगावच्या यात्रा उत्साहात होत आहे. परंतु मावळ तालुक्यात लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे शर्यतींना परवानगी मिळत नव्हती. मात्र, आता संसर्ग आटोक्यात आल्यानंतर मावळात बैलगाडा व छकडी स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला आहे. शेकडोंच्या संख्येने बैलगाडा मालक शर्यतीत सहभाग घेतात.
गावांमध्ये नवचैतन्य
आठ वर्षांच्या बंदीनंतर गेल्यावर्षी कायद्याच्या आधारे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली आणि शेतकऱ्यांमध्ये एक नवचैतन्य पसरले. बैलांच्या किमती वाढल्या, बळीराजाला उत्पन्नही मिळू लागले. हौस पूर्ण होऊ लागली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन सरकारच्या नियमित असलेल्या कायद्याला अनुसरून होऊ लागलेले आहे. परिणामी सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीची धामधूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. शर्यतीच्या निमित्ताने गावोगावी पै-पाहुण्यांची गर्दी उसळत आहे.. त्यांच्याबरोबर आलेले सहकारी, विविध प्रकारचे दुकानदार, बैलगाडा शौकीन आणि ग्रामस्थ यामुळे गावोगावी जत्रेला प्रचंड गर्दी होते.
शर्यतीच्या निमित्ताने ही गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना रोजगाराच्या संधी यानिमित्ताने निर्माण होत आहेत. मोठमोठी बक्षिसे व भव्य आयोजन यामुळे शर्यतीचे स्वरूपही आकर्षक झाले आहे. लाइव्ह चित्रण प्रणालीमुळे यात्रांना ग्लोबल स्वरूप प्राप्त झाला आहे.
खेळ शर्यतीचा
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव व परंपरा असलेले म्हणजेच शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत. शेतीच्या कामांमध्ये मदत करणारी बळीराजाची बैलजोडी म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण असतो. पोटच्या पोराप्रमाणे जनावरांचा सांभाळ केला जातो. शेतीमध्ये काबाडकष्ट करत असताना कामाच्या व्यापातून मोकळीक होण्यासाठी स्वतःचे व समाजाचे मनोरंजन व्हावे व त्याचबरोबर आपल्या नंदीचे कौतुक व्हावे या हेतूने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव बैलगाडा शर्यतीत सहभागी होत असतात. बदलत्या काळानुसार बैलगाडा शर्यतीचे स्वरूप अधिकाधिक ग्लोबल होत आहे. लाखो रुपयांची बक्षिसे शर्यतीत मिळत असतात. दुचाकी पासून ते अगदी ट्रॅक्टर, जेसीबीपर्यंतची बक्षीस आता बैलगाडा शर्यती मध्ये पाहायला मिळत आहेत.
छायाचित्र: LON23B02345/02346