
‘कैवल्यधाम’च्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण
लोणावळा, ता. ८ : येथील जगप्रसिद्ध योग प्रशिक्षण संस्था असलेल्या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या बोधचिन्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण झाले.
स्वामी कुवल्यानंद यांनी १९२४ मध्ये योगा संस्थेचे लोणावळा येथे स्थापना केली. योग क्षेत्रातील सर्वात प्राचीन संस्था असून, पुढील वर्षी शतक महोत्सव साजरा करीत आहे. शतकपूर्तीनिमित्त योग साधनेशी निगडित विविध उपक्रमांचे कैवल्यधाम संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘शताब्दी वर्ष बोधचिन्ह’ व शताब्दी वर्ष कार्यक्रम पत्रिकेचे राजभवन येथे राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी कैवल्यधाम संस्थेचे विश्वस्त सुबोध तिवारी, केंद्र सरकारचे माजी सचिव व कैवल्यधाम संस्थेचे सल्लागार मंडळाचे सदस्य बीसी खटुआ, संस्थेचे अधिकारी रवी दीक्षित, बर्नार्ड बिट्टू , बंडू कुटे, मीनल डुगर, अश्विनी मुदलगीकर, भूमी चोक्सी, निखिल जसुजा, निशांत जैन, त्रिवेदी कार्तिक केसरकर, गौरव मशरूवाला, मयंक लुणावत आदी उपस्थित होते.
सुबोध तिवारी यांनी कार्यक्रमाची सुरुवात शांतीपाठाने करून कैवल्यधाम संस्थेची संक्षिप्त माहिती तसेच शताब्दी वर्षात आयोजित उपक्रमांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचा दिलेला संदेश संस्था योगप्रचार व प्रचार करून देश-विदेशातील कानाकोपऱ्यात योगाचा संदेश पोहोचवण्याचे कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार काढत राज्यपाल कोश्यारी यांनी कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. सूत्रसंचालन व आभार अनिल त्रिवेदी यांनी मानले.
छायाचित्रे: LON23B02348/02349