दृतगती मार्गावरील निष्पाप जीवांच्या बळींना जबाबदार कोण?

दृतगती मार्गावरील निष्पाप जीवांच्या बळींना जबाबदार कोण?

अपघात रोखण्यासाठी हवी सुसज्ज यंत्रणा
पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग ः अद्ययावत ट्रामा केअर सेंटर, एअर ॲम्बुलन्सचीही गरज

भाऊ म्हाळसकर ः सकाळ वृत्तसेवा
लोणावळा, ता. १४ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ रासायनिक टँकरला झालेल्या अपघातात आगीचा भडका उडाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठीची सुरक्षाव्यवस्था, जखमींवर तातडीने उपचार, सुरळीत वाहतूकव्यवस्था आदी प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

तीव्र उतार, वळणाचाही फटका

मंगळवारी टॅंकरला झालेला अपघात हा अतिवेग व त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे दिसून येत आहे. द्रुतगती मार्गावर वाहने कठड्याला धडकतात अथवा घासतात. त्यामुळे घर्षण होऊन रसायने, एलपीजी वाहनांना आग लागण्याची शक्यता असते. बोरघाटातील तीव्र उतार, वळण आणि अवजड वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. दरम्यान ब्रेक न लागणे, नादुरुस्त होणे, टायर फुटणे यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे.

तकलादू उपाययोजना

द्रुतगती मार्गावरील गेल्या तीन वर्षांतील अपघातांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाण हे निम्म्यावर आले आहे. मात्र; गेल्या काही अपघातांतील मृतांचे आकडे हे चिंताजनक आहेत. रस्ते विकास महामंडळ, मार्गाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या आयआरबी कंपनी, महामार्ग पोलिसांच्या वतीने महामार्गावर माहितीदर्शक व दिशादर्शक फलक, रोड स्टड, स्पीड गन, सीसीटीव्ही कॅमेरे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र; या उपाययोजना तकलादू ठरत आहेत.
----------------------
जखमींना तत्काळ उपचार मिळावेत
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या टॅंकरमधील ज्वालाग्रही रसायन मार्गावर पसरल्याने मोठा भडका उडाला. या घटनेत टॅंकरसह दोन दुचाकी, दोन टेंपो, एक मोटार तसेच मदतीसाठी आलेली क्रेन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अशा प्रकारचे अपघात रोखणे व अपघातानंतर करण्यात येणारी सक्षम यंत्रणा व साधने रस्ते विकास महामंडळ व टोल कंपनीकडे नाहीत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा तर हवीच. मात्र, तरीही दुर्दैवाने अपघात झाल्यास, मदतीसाठीची यंत्रणाही सज्ज हवी.

एअर ॲम्ब्युलन्स मिळावी
अपघातानंतर दिरंगाई झाल्यास रुग्णाचा जीव जाण्याची भीती असते. त्यामुळे जखमींवर जागेवर व वेळीच उपचार होण्याची गरज आहे. अपघात झाल्यास रुग्णांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालय, सोमाटणे किंवा निगडी येथील खासगी रुग्णालयांचा पर्याय आहे. रस्ते विकास महामंडळाच्यावतीने ओझर्डे येथे ‘ट्रामा केअर सेंटर’ ही कार्यान्वित होत आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी एअर ॲम्ब्युलन्स तैनात करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ती लवकर उपलब्ध हवी.
-------------------
अग्निशामक यंत्रणा सक्षम हवी
द्रुतगती मार्गावर यापूर्वीही एलपीजी गॅस, ज्वलनशील द्रवपदार्थाची वाहतूक करणाऱ्या टॅंकर, ट्रकला अपघात झाले आहेत. वाहनांना आगी लागण्याच्या घटना थांबत नाहीत. तुटपुंज्या अग्निशामक यंत्रणेमुळे काही वेळा आयएनएस शिवाजी नौदल केंद्र, खोपोली, लोणावळा नगरपरिषदेच्या अग्निशामक यंत्रणेची काही वेळा मदत घ्यावी लागते. त्यामुळे द्रुतगती मार्गावर पुरेशी अग्निशामक यंत्रणा असायला हवी.

कुसगावजवळ ‘ट्रामा सेंटर’ची गरज
सध्या द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. बोरघाटात द्रुतगती मार्ग रुंदीकरण, दुरुस्तीसह मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळेही अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मार्गावरील
अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी कुसगाव टोलनाक्याजवळील पडीक जागेत ‘ट्रामा केअर सेंटर’ उभारावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
-----------------
कोट
--------
अपघाताच्या घटना टाळण्यासाठी चालकाने प्रवासातील धोके समजून घ्यावेत, वेगमर्यादा पाळावी. कंपन्यांनीही जबाबदारी घ्यावी.
रसायने, ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालविण्याचे तसेच आपत्कालीन स्थितीत काय खबरदारी घ्यावी, यासाठी प्रशिक्षण द्यावे, यासाठी काही कंपन्या, वाहतूकदार यांची बैठक घेणार आहे.
-लता फड, अधीक्षक, रस्ते वाहतूक सुरक्षा


अपघाताची प्रमुख कारणे -

* वाहनांचा जादा वेग
* धोकादायक ओव्हरटेकिंग, लेन कटिंग
* मद्यपान करून गाडी चालवणे.
* वाहनामध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक
* गाडी चालवण्याच्या कौशल्याचा अभाव
* वाहतूक शिस्तीचे अपुरे ज्ञान
* चालकांचा थकवा
* महामार्गावर येणारे अडथळे, मार्गातील नादुरुस्त वाहने
* तांत्रिक बिघाड, टायर फुटणे
------------------------------
द्रुतगती मार्गावरील अपघाती ठिकाणे -

- किवळे येथे कात्रज बाह्यवळण मार्गाशी जोडणारे आत बाहेर पडणारी मार्गिका
- कामशेत बोगद्याअगोदर ओझर्डे पुलाजवळ स्थानिकांनी संरक्षक कुंपण तोंडून पाडलेला धोकादायक रस्ता
- अमृतांजन पुलानंतर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरुन द्रुतगतीस मिळणारा रस्ता
- खोपोली एक्झिट
- आडोशी बोगद्यानंतर फूड मॉलपर्यतचा तीव्र उतार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com