तरुणाची खंडाळ्यातील दरीत उडी मारून आत्महत्या

तरुणाची खंडाळ्यातील दरीत उडी मारून आत्महत्या
Published on: 

लोणावळा, ता.१७ : चाकण येथील तरुणाने खंडाळ्यातील साडेतीनशे फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरीत उडी मारण्यापूर्वी त्याने अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे, त्याच्या मृतदेहाचे ‘लोकेशन’ समजण्यास बचाव पथकास यश आले.
सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सूर्यकांत हा चाकण परिसरातून ९ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्यानंतर, चाकण पोलिसांमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. तपासात त्याच्या मोबाईलचे शेवटचे ‘लोकेशन’ हे लोणावळा दाखविले होते.

तब्बल ३७० फूट खोल दरी
सूर्यकांत याने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ तयार करुन तो आपल्या कुटुंबीयांच्या मोबाईलवर पाठवला होता. त्यावरून लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाने पोलिसांच्या मदतीने त्याने नेमकी कुठे आत्महत्या केली ? याचा शोध घेतला. त्यानुसार, राजमाची उद्यानालगत खोल दरीमध्ये शोध घेतला असता आठवडाभरानंतर त्याचा मृतदेह तब्बल ३७० फूट खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला.

योगेश उंबरे, रोहीत वर्तक, आदित्य पिलाने, राजेंद्र कडू, महेश मसणे, सुनील गायकवाड, आनंद गावडे, अनिल सुतार, कपिल दळवी, करण वरे, सागर कुंभार, सागर दळवी, दिनेश पवार, शिवराज गायकवाड, प्रिंस बैठा, समीर देशमुख, गुरुनाथ साठेलकर, महेश भोसले, धर्मा पाटील आदींनी बचावकार्यात सहभाग घेत प्रजापती यांचा मृतदेह मोठ्या प्रयासाने दरीतून वर काढला. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे सूर्यकांत प्रजापती याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याने आत्महत्या नेमकी का केली ? याचा तपास लोणावळा शहर पोलिस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.