लोणावळा टपाल कार्यालय इमारत धोकादायक
लोणावळा, ता. ७ : गवळीवाडा मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीची अतिशय दुरवस्था झाली असून कधीही स्लॅब कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कर्मचारी अक्षरशः धोका पत्करुन काम करत आहेत. याच कार्यालयात स्वतंत्र वितरण केंद्र (आयडीसी) केंद्रही प्रस्तावित आहे. मात्र, इमारतीचा दर्जा व्यवस्थित नसल्याने कामाचा दर्जा सुधारणार कसा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात सध्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सोशल मीडिया आणि तांत्रिक बाबतीत विविध विभाग कात टाकत आहेत. तरी आजही देशाच्या टपाल कार्यालयाच्या व्यवहारांवर ग्राहकांचा विश्वास आहे.
गवळीवाडा येथे १९८१ मध्ये बांधण्यात आलेले मुख्य टपाल कार्यालय देखील त्याला अपवाद राहिलेले नाही. नागरिकांना त्याचा मोठा उपयोग होत आहे. मात्र, सध्या छताला गळती लागली आहे. इमारतीचा स्लॅबचा भाग कोसळला आहे. भिंतीचे पोपडे पडत आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. टपाल कार्यालयातील कर्मचारी अशा धोकादायक वातावरणात भीतीच्या छायेत काम करीत आहेत. सुदैवाने अद्याप कुणाचाही अपघात झाला नाही. मात्र, पुढील काळात अपघात होणारच नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या इमारतीची डागडुजी करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे. या कार्यालयाने पुणे येथील वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र स्थापत्य विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
वितरण केंद्र प्रस्तावित
याच मुख्य कार्यालयात टपाल विभागाच्यावतीने स्वतंत्र वितरण केंद्र (आयडीसी) प्रस्तावित आहे. भारतीय टपाल विभागाचा हा उपक्रम असून या केंद्राच्या माध्यमातून टपाल व इतर साहित्य वितरणासाठी समर्पित केंद्रे स्थापन केली जाणार आहे. प्रमुख कुरिअर कंपन्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या पद्धतींप्रमाणेच त्यांच्या वितरण कार्याचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
लोणावळा टपाल कार्यालयात धोका पत्करुन टपाल वाहकांसह अन्य कर्मचारी काम करत आहेत. लोणावळा टपाल कार्यालयाची झालेली दुरवस्था पाहून राज्य शासन आणि टपाल प्रशासन यांनी कोणतीही दुर्घटना होण्याआधी लक्ष द्यावे. - संदीप पोटफोडे, लोणावळेकर
लवकरच डागडुजी
पुणे विभागाचे अधीक्षक यांनीही येथील मुख्य टपाल कार्यालयाला भेट देत पाहणी केली आहे. दुरुस्तीचा अहवाल तयार करण्यात आला असून लवकरच इमारतीची डागडुजी होणार असल्याचे टपाल खात्याचे पुणे विभागाचे सहाय्यक अधीक्षक मुन्नाकुमार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.