‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आॅक्टोंबरअखेर पूर्ण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
लोणावळा, ता. ११ ः पुणे-मुंबई दरम्यान द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आॅक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी बोरघाटात प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी फडणवीस बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल कुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई दरम्यान एक इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्माण होणार असून, पुण्याहून एक ते सव्वा तासात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचता येणार आहे. घाटातील या टप्प्यात वाहतूक कोंडी होत असते. या प्रकल्पामुळे घाट पूर्णपणे वगळला जाणार असून, त्यामुळे वाहतूक कोंडी मुक्तीचा अनुभव घेता येणार आहे.’’
या प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम ९९ टक्के तर; दुसऱ्या टप्प्यातील काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे एकूण काम ९४ टक्के पूर्ण झाले असून, येत्या डिसेंबरअखेर प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदाराच्यावतीने देण्यात आले आहे. मात्र हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची आमची मागणी असून, त्याच्याही पूर्वी प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी आम्ही चर्चा करून नवीन डेडलाईन ठरविणार आहे. प्रकल्पाचे काम प्रतिकूल परिस्थितीत सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व मी ‘एमएसआरडीसी’चा मंत्री असताना जी कामे सुरू केली, ती सर्व कामे आमच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहेत. मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करताना अत्याधुनिक इंजिनिअरिंगचा वापर केला असून, लोणावळा तलावाच्या १७५ मीटर खालून बोगदा करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात कमी होणार आहेत. वेळही वाचणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
काय आहे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प
खोपोली एक्झिट ते कुसगाव बु. येथील सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचा मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर १९. ८ किलोमीटर आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे हे अंतर १३.३ किलोमीटरपर्यंत कमी होणार असून, प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प २०१९ मध्ये सुरू झाला होता आणि २०२२ मध्ये पूर्ण होणार होता.
‘‘पुणे ते मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई, पुणे आणि मुंबई मेट्रोपॉलिटन विभागात (एमएमआर) नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्माण होऊन, या भागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
प्रकल्पाची वैशिष्ट्ये -
- देशातील सर्वात लांब बोगदा ८.९ किलोमीटर आणि १.७ किलोमीटर लांबीचे असे दोन बोगदे
- ८४० मीटर लांबीचा केबल स्टेड आणि सर्वात उंच ६५० मीटर लांबीचे दोन पूल
- एका पुलाची उंची १८५ मीटर
- एक बोगदा आशियातील सर्वात रुंद २३.३० मीटरचा
- प्रकल्पाची अंदाजित रक्कम ६ हजार ९९५ कोटी
- दैनंदिन सुमारे एक लाख २० हजार वाहने धावण्याची क्षमता.
छायाचित्र: 04465, 04466