मंगलमय वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठा
लोणावळा, ता. २७ : सर्वांनाच उत्सुकता असलेल्या गणरायाचे बुधवारी (ता.२७) थाटात आगमन झाले. घरोघरी आणि मंडळांतर्फे गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. सर्वांचा लाडका व मांगल्याचे प्रतीक असलेला गणेशोत्सव सध्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. लोणावळ्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तरीही भाविकांसह मंडळांचा उत्साह कायम दिसून आला.
गणेशाची मूर्ती भक्तीमय वातावरणात घरी नेण्यासाठी दुकानांमध्ये बुधवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होत. गेले दोन दिवस लोणावळा शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. आराशीच्या वस्तू, फराळ तसेच मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. प्रामुख्याने गणपतीसाठी आकर्षक मखरे, सजावटीचे साहित्य, फळे, फुले-हार विक्रेत्यांकडे प्रचंड गर्दी केली होती. शहरातील मिठाईवाल्यांच्या दुकानांमध्येही फराळाचे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे. यात बालगोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगरपालिका रुग्णालयादरम्यान जत्रेचे स्वरूप आले होते. गावठाण, नांगरगाव येथील काही मंडळांनी मंगळवारी रात्रीच ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दुपारनंतर शहरातील बहुतेक मंडळांनी मिरवणूक काढत विधिवत प्राणप्रतिष्ठा केली.