बहुरंगी लढतींमुळे कमालीची चुरस
लोणावळा नगर परिषद निवडणूक
---------------------------
भाऊ म्हाळसकर ः सकाळ वृत्तसेवा
लोणावळा, ता. २० : पर्यटननगरी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष, गट-तट आणि स्वतंत्र उमेदवारांच्या बहुरंगी लढतीमुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
स्थानिक विकास, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे आणि पर्यटन वाढीचे दडपण या मुद्द्यांवरून सत्तास्थापनेची लढाई रंगणार आहे. याठिकाणी राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दाही प्रखरपणे पुढे आला असून, लोणावळ्याचे राजकारण लोणावळेकरच ठरविणार हा मुद्दाही चर्चेत आहे.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या ‘आमदार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजबूत जनसंपर्क जाळ्याची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीला पणाला लागणार आहे. त्याचबरोबर भाजपचे लोणावळा प्रभारी असलेले माजी मंत्री बाळा भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी यांच्यासह रिपाइंचे पश्चिम विभाग अध्यक्ष व रामदास आठवले यांचे कट्टर सहकारी सूर्यकांत वाघमारे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.
लोणावळ्याचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून माजी नगरसेवक गिरीश कांबळे, शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजेंद्र दिवेकर हे प्रामुख्याने रिंगणात आहेत.
स्थानिक पातळीवर उभे राहिलेले काही उमेदवार आणि त्यांना मिळणारा जनाधार ही चर्चा सध्या जोरात आहे. विरोधक मात्र या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काही प्रभागांत त्रिकोणी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीची स्थिती निर्माण झाली असून मतविभाजन हा निर्णायक घटक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि प्रभागनिहाय समीकरणे यावर आधारित अत्यंत रोचक असे चित्र उभे राहत असून, अंतिम निकालापर्यंत कोणती बाजू वरचढ ठरेल, याबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे.
शहरात सध्या वाहतुकीचा जटिल बनलेला प्रश्न बनला आहे. वाढती अतिक्रमणे, इंद्रायणी नदीसुधार यासह प्रलंबित विकासकामे तसेच प्रकल्प (उड्डाणपूल, उद्याने, रोप वे, अम्युझमेंट पार्क) रखडले आहेत.
आमदार शेळके यांची प्रतिष्ठा पणाला
लोणावळ्यातील ही रंगतदार निवडणूक स्थानिक राजकारणासह मावळ तालुक्यातील नेत्यांच्या प्रतिष्ठेलाही मोठी परीक्षा ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांना लोणावळा शहरातून १७ हजाराहून अधिक असे प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. मात्र, नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्यापुढे भाजपच्या स्थानिक नेतृत्व मानले जात असलेल्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. आज आमदार सुनील शेळके लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे जात असून, त्यांच्या नावावर मतांचा जोगवा मागितला जात आहे. कुठल्याही परिस्थितीत लोणावळा नगरपरिषदेत सत्ता आणायचीच असा चंग बांधलेले आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरात तळ ठोकला आहे. त्यांनाही या परिस्थितीत घरोघरी प्रचार करावा लागत आहे.
मागील पक्षीय बलाबल
एकूण सदस्य संख्या - २६
भाजप - ९
शिवसेना- ६
काँग्रेस - ६
रिपाइं - १
अपक्ष - ४
राष्ट्रवादी काँग्रेस- ०
नगराध्यक्ष पद - सुरेखा जाधव, भाजप (सर्वसाधारण महिला)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

