तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आंतरभारती बालग्रामचा प्रकल्प प्रथम
लोणावळा, ता. १ : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भुशी येथील आंतरभारती बालग्राम विद्यालयाने सादर केलेल्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकाविला.
पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग), मावळ तालुका पंचायत समिती, तालुका मुख्याध्यापक संघ आणि मावळ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा महाविद्यालयात ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात सहावी ते बारावीच्या गटातील ५७ शाळांमधून एकूण १२० प्रकल्प सादर करण्यात आले. यामध्ये नववी ते बारावी गटात आंतरभारती बालग्राम विद्यालयाने सादर केलेल्या ‘अॅडव्हान्स एलपीजी गॅस डिटेक्शन सिस्टीम’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. हा प्रकल्प दहावीतील विद्यार्थी ओंकार टूले याने विज्ञान शिक्षिका स्लोमी बिजू, सोमनाथ ठोंबरे व सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साकार केला.
पारितोषिक वितरण समारंभात पुणे जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर आणि संस्थेचे विश्वस्त दत्तात्रेय येवले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश कदम, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मेधा ओक, शिक्षक, पालक, आजी-माजी विद्यार्थी, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
छायाचित्र: LON25B05063

