सुट्ट्या, प्रजासत्ताक दिनामुळे लोणावळा-खंडाळ्यात गर्दी
लोणावळा, ता. २३ : शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांना प्रजासत्ताक दिन जोडून आल्यामुळे पर्यटन नगरी लोणावळा आणि खंडाळा परिसरात पर्यटकांचा मोठा ओघ वाढत आहे. ‘लाँग विकेंड’चा आनंद घेण्यासाठी शहरातील हॉटेल्स, खासगी बंगले आणि रिसॉर्ट्सचे बुकिंग आतापासूनच ‘हाऊसफुल’ होऊ लागले आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पर्यटनस्थळांवर गर्दी
नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असूनही लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, राजमाची गार्डन आणि लोहगड, राजमाची किल्ला, कार्ला-भाजे लेणी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेत पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहेत. स्थानिक हॉटेल्स, लॉज आणि रिसॉर्ट्स ७० ते ८० टक्के ‘फुल्ल’ झाली असून, बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. कार्ला येथील एमटीडीसी पर्यटक निवास ‘हाऊसफुल’ झाले आहे. अनेक पर्यटकांची पावले कॅम्पिंग व पवना धरणाकडे वळत आहे.
बोरघाटात वाहतूक संथ गतीने
पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीचा मोठा ताण पडला आहे. विशेषतः बोरघाटात (खंडाळा घाट) वाहनांची वर्दळ वाढल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. टाटा कॅम्प, अमृतांजन पूल आणि घाट चढताना वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.
---
गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाबाबत माहिती घेणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. सलग सुट्यांमुळे हॉटेल व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. आम्ही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत.
- अनिश गणात्रा
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

