टँकरमधून वायुगळती, द्रुतगतीवर महाकोंडी
लोणावळा, ता. ४ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील खोपोली हद्दीत आडोशी बोगद्याच्या अलीकडेच मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास टँकर उलटला. त्यातून अत्यंत ज्वलनशील प्रोपिलीन वायूची गळती सुरू झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. यामुळे द्रुतगती मार्गावर २४ तासांहून जास्त वेळ कोंडी होऊन वाहनांच्या सुमारे २० ते २५ किलोमीटर रांगा लागल्या. परिणामी हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यात जीवितहानी झाली नसली तरी द्रुतगती मार्गाच्या इतिहासात इतका वेळ कोंडी होण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.
टँकर मुंबईच्या दिशेने जात होता. त्यातून वायुगळती सुरू होताच प्रशासनाने तातडीने खबरदारीची उपाययोजना सुरू केली. खोपोली नगरपरिषद, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी), रिलायन्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) अग्निशामक यंत्रणा यांचे तज्ज्ञ, अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी अथक प्रयत्न सुरू केले. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वायूगळतीचे प्रमाण कमी झाले. त्यानंतर उलटलेल्या टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे चार वाजण्याच्या सुमारास काम सुरू झाले. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार हे काम रात्री किमान दहा वाजेपर्यंत चालणार होते.
२०-२५ किमी रांगा
या कालावधीत मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका पूर्णपणे बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचाच वापर केला जात होता. बोगद्याच्या अलीकडेच टँकर उलटल्यानंतर मंगळवारी सायंकाळपासूनच कोंडी होऊ लागली. पुण्याच्या दिशेने सुमारे २० ते २५ किलोमीटर, तर मुंबईच्या दिशेने खालापूर टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याकडे येणारी वाहतूक टप्प्या टप्प्याने सुरू होती. मात्र, दोन्ही मार्गांवर हजारो वाहने असल्याने २४ तासांपासून जास्त वेळ वाहतूक विस्कळित झाली. बुधवारी दुपारी दोननंतर एका मार्गिकेवरून पंधरा मिनिटांच्या अंतराने वाहने सोडण्यात येत होती.
प्रवाशांचे हाल
द्रुतगती व जुना राष्ट्रीय महामार्गावर कित्येक तासांपासून वाहने जागच्या जागी उभी असल्याने प्रवाशांचे, विशेषतः महिला आणि मुलांचे प्रचंड हाल झाले. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना अन्न आणि पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. स्वच्छतागृहाअभावी विशेषतः महिलांचे हाल झाले. या कोंडीत काही आजी-माजी आमदार, प्रशासकीय अधिकारी व कलाकार मंडळीही अडकली. भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीलाही फटका बसला. कामानिमित्त दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.
पोलिस, स्वयंसेवी संस्थांची मदत
कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे हाल पाहून लोणावळा पोलिस, लोणावळा टॅक्सी चालकमालक संघटना, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत द्रुतगती मार्ग, बोरघाट परिसर, वलवण व कार्ला येथे पिण्याचे पाणी, चहा, बिस्कीट व नाश्ता वाटप केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
रायगडचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल, महामार्ग पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अभिजित शिवतरे, खोपोलीचे पोलिस निरिक्षक सचिन हिरे, रसायन तज्ज्ञ धनंजय गीध, आयआरबी कर्मचारी देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.
''एनडीआरएफ'', ''बीपीसीएल'', दीपक फर्टीलायझर, रिलायन्स कंपनीचे तज्ञ पथक घटनास्थळी दाखल होत गॅस गळती रोखण्यास सुरवात झाली.
---
पहिल्यांदाच इतकी कोंडी
द्रुतगती मार्गावर बोरघाटात दस्तुरीनजीक २०१४ मध्ये क्रेन अपघातामध्ये २७ ते २८ तास वाहतूक विस्कळित झाली होती. त्याआधी सात जुलै २०१२ रोजी खंडाळा एक्झिट येथे प्रोपिलीन वायूची टँकरमधून गळती झाली होती. जुन्या महामार्गावर सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी पाथरगाव येथे एलपीजी टँकर अपघातात वायुगळती झाली होती. तेव्हा इतका वेळ वाहतूक कोंडी झाली नव्हती.
पर्यायी मार्गांचा वापर
- लोणावळा - खोपोली : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोली मार्गे
वडगाव फाटा - उर्से, सोमाटणे - परंदवडी, कामशेत - पवनानगर - ताम्हिणी मार्गे
- ताम्हिणी घाट मार्ग : पुणे - पौड - ताम्हिणी घाट - माणगाव - मुंबई
माळशेज घाट मार्ग : पुणे - चाकण - नारायणगाव - माळशेज घाट - कल्याण/ठाणे
---
बुधवारी सकाळी सहा वाजता पुण्यातून निघालो. कार्लामध्येच सात तास अडकून पडलो आहे. पंधरा तास होतात, पण टँकर काढला जात नाही हे प्रशासनाचे अपयश आहे. एखादा व्हीआयपी जाऊ दे, लगेच रस्ता मोकळा होतो, पण इथे रुग्ण, महिला, मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.
- विजय तिपाद्री, प्रवासी, पुणे
---
आम्ही कित्येक तासांपासून अडकून पडलो आहोत. खाण्या-पिण्याची, स्वच्छतागृहाची कुठलीही सोय नाही. त्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
- अकबर अहमद, वाहनचालक
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

