वाढत्या आत्महत्यांच्या घटनांनी 
पर्यटनस्थळांवर काळी छाया

वाढत्या आत्महत्यांच्या घटनांनी पर्यटनस्थळांवर काळी छाया

Published on

लोणावळा, ता. १३ : सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे केंद्र असलेले लोणावळ्यातील लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे सध्या वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेत आली आहेत. गेल्या काही वर्षांत या परिसरात आत्महत्यांचे प्रयत्न, उड्या मारून जीवन संपवण्याचे प्रकार, तसेच अपघाती मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येथे वाढलेल्या अनुचित प्रकारांमुळे या ठिकाणांची ओळख बदलत चालली आहे. घटनांचा वाढता आलेख, अपुरी सुरक्षा आणि सामाजिक कारणांमुळे या पर्यटनस्थळांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पर्यटनस्थळांची प्रतिमा वाचवण्याचे आव्हान
लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट ही लोणावळ्याची ओळख आहेत. मात्र या पर्यटनस्थळांवर वाढत्या आत्महत्यांच्या घटना आणि अपघातांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन, पोलिस, स्थानिक नागरिक आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच या घटनांना आळा घालणे शक्य आहे. अन्यथा, पर्यटनाचे केंद्र असलेली ही ठिकाणे दुर्दैवी घटनांची ओळख बनण्याचा धोका नाकारता येणार नाही.

केवळ दीड महिन्यातच चार घटना
- २ जानेवारी : पुण्यातील परेश हटकर (वय ३८) या बँकिंग क्षेत्रातील तरुण अधिकाऱ्याची आत्महत्या
- १ फेब्रुवारी : ट्रेकिंगची आवड असणाऱ्या नवी मुंबईतील श्रेया पाटील (वय २०) या तरुणीने जीवन संपविले
- ८ फेब्रुवारी : मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे पुत्र प्रज्वल गिरी (वय २६) यांचा लोणावळा येथे दरीत कोसळून मृत्यू
- १२ फेब्रुवारी : वीरेंद्र सिन्हा (वय ३२) या तरुणाची दरीत उडी मारत आत्महत्या
(यापूर्वीही आत्महत्या व अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.)

घटनांमागील कारणे
- मानसिक तणाव, नोकरीतील अस्थिरता, कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरणातील अपयश, आर्थिक अडचण आणि नैराश्य ही आत्महत्येची प्रमुख कारणे ठरत आहेत.
- अनेक ठिकाणी मजबूत संरक्षक कठडे, चेतावणी फलक किंवा सीसीटीव्ही यंत्रणा अपुरी असल्याने व्यक्तींना धोकादायक भागात जाणे सहज शक्य होते.
- विशेषतः संध्याकाळनंतर किंवा रात्री या ठिकाणी पोलिस किंवा सुरक्षा कर्मचारी कमी प्रमाणात असल्याने अनुचित प्रकारांना वाव मिळतो.
- रिल्सच्या नादात धोकादायक ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढण्याची वाढती प्रवृत्तीही अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

आवश्यक उपाययोजना
- धोकादायक ठिकाणी मजबूत संरक्षक कठडे आणि सुरक्षा जाळी बसवणे.
- महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवून सतत निरीक्षण करणे.
- संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, विशेषतः संध्याकाळ आणि रात्री नियमित पोलिस गस्त आवश्यक.
- धोकादायक क्षेत्र, प्रवेश निषिद्ध असे स्पष्ट फलक लावणे आणि जनजागृती मोहीम राबवणे.
- अत्यंत धोकादायक भागात प्रवेशावर निर्बंध आणणे.

‘‘प्रत्येक घटनेनंतर पोलिसांना तत्काळ घटनास्थळी धाव घ्यावी लागते. बचावकार्य, पंचनामा, शवविच्छेदन प्रक्रिया आणि तपास यामुळे मनुष्यबळ आणि संसाधनांवर अतिरिक्त भार पडतो.
- दिनेश तायडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

‘‘अनेकदा बाहेरगावाहून आलेले तरुण, मानसिक तणावाखालील व्यक्ती किंवा वैयक्तिक कारणांमुळे व्यथित असलेले नागरिक या ठिकाणी येऊन टोकाचे पाऊल उचलतात. प्रत्येक घटनेनंतर बचावकार्य करण्यात येते तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि स्थानिक स्वयंसेवकांनाही सतत सज्ज राहावे लागते.
- सुनील गायकवाड, शिवदुर्ग मित्र, लोणावळा

‘‘मानसिक तणावग्रस्त व्यक्तींना समाज आणि कुटुंबाच्या आधाराची गरज असते. आत्महत्येच्या प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींना मदत मिळावी व त्यांना योग्य मार्गदर्शन करणे यासाठी हेल्पलाइन आणि समुपदेशन केंद्र सुरू करावे.
- श्रद्धा साकतकर, समुपदेशक व मानसोपचार तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com