लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाला यश

लोणावळा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाला यश

Published on

लोणावळा, ता. १८ : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले आहे. विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक व प्रा. संदीप लबडे यांच्या ‘पावडर सिल्क वापरून सांडपाणी प्रक्रियाः मॅलाकाडट ग्रीन ऑक्सलेट शोषणाचे स्पेक्टोस्कोपिक व मॉलिक्युलर डॉकिंग अंतर्दृष्टी या संशोधन लेखास नेदरलँड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘एल्सवायर’ च्या ‘मटेरिअल्स केमिस्ट्री अँड फिजिक्स’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये स्थान मिळाले आहे.
या संशोधनात सांडपाण्यातील अत्यंत विषारी मॅलाकाइट ग्रीन ऑक्सलेट रंगद्रव्य काढण्यासाठी ‘पावडर रेशीम’ या पर्यावरणपूरक जैव-शोषकाचा प्रभावी वापर दर्शविण्यात आला आहे. अभ्यासानुसार रेशीम पावडरने ९९ टक्क्यांपर्यंत रंगनिर्मूलन साध्य केले असून शोषण प्रक्रिया अवघ्या ६० सेकंदांत पूर्ण होत असल्याचे आढळले. कमाल शोषण क्षमता २३.४१ मिली ग्रॅम/ग्रॅम नोंदवली गेली.
कमी खर्चिक, सहज उपलब्ध आणि शाश्वत स्रोत म्हणून पावडर रेशीम सांडपाणी शुद्धीकरणासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो, असा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाचा औद्योगिक स्तरावर वापर, पर्यावरणीय सुरक्षितता आणि प्रत्यक्ष सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांमध्ये उपयुक्तता यांचा सखोल अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाकडून देण्यात आली.
हे संशोधन प्रा. डॉ. रंजना जाधव व प्रा. डॉ. शकुंतला सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉ. किरण लाळगे यांच्या संगणकीय सहकार्याने पूर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख व सर्व विश्वस्तांनी संशोधकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com