द्रूतगती मार्गावर प्रोपलीन टँकरचा पुन्हा अपघात

द्रूतगती मार्गावर प्रोपलीन टँकरचा पुन्हा अपघात

Published on

लोणावळा, ता.२३ : पुणे- मुंबई द्रूतगती मार्गावर बोर घाटातील अमृतांजन पुलाजवळ सोमवारी (ता.२३) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास प्रोपलीन या ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. सुदैवाने टँकरमधून वायू गळती झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच २० दिवसांपूर्वी ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोचीहून गुजरातकडे प्रोपलीन गॅस घेऊन जाणारा टँकर (क्रमांक एन एल ०१- एएफ ५०४०) चालकाचे खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतार व धोकादायक वळणावर नियंत्रण सुटले. सिमेंटचा दुभाजक तोडत रस्त्यालगतच्या गटारात जाऊन तो अडकला. टँकर उलटला नसल्याने संभाव्य स्फोटाचा धोका टळला.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील, नीलेश सरोदे, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, रसायन तज्ञ धनंजय गीध यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली.
यानंतर युद्धपातळीवर कारवाई करत क्रेनच्या साहाय्याने सुमारे अर्ध्या तासात अपघातग्रस्त टँकर दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. या कालावधीत पुणे - मुंबई मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. टँकर हटविल्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेचे वृत्त समजताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ३ फेब्रुवारी रोजी आडोशी बोगद्याजवळ झालेल्या प्रोपलीन गॅस टँकर अपघातामुळे द्रूतगती महामार्ग व जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तब्बल ३३ तास वाहतूक कोंडी झाली होती. त्या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच हा प्रकार घडल्याने प्रशासन व प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, यावेळी टँकरमधून वायू गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला. प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com