महिला बचत गट उत्पादन, खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन
लोणावळा, ता. १४ : लोणावळा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी ‘महिला बचत गट उत्पादित वस्तू विक्री व खाद्यपदार्थ महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.
महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना स्वावलंबी बनविणे व त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथील पुरंदरे मैदान येथे हा महोत्सव शनिवार (ता. १४) व रविवार (ता. १५) असे दोन दिवस सुरू राहणार आहे. या महोत्सवात विविध महिला बचत गटांचे सुमारे ६० स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यामध्ये घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास कडू, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वप्ना कदम, शिक्षण समिती सभापती दीपा अगरवाल यांच्यासह नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात एचडीएफसी व पीडीसीसी बँकेकडून कर्जासंदर्भात माहिती, समूह नृत्य, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित महिलांचा सत्कार, बक्षीस वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत.
या उपक्रमासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वप्ना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपसभापती भाग्यश्री जगताप तसेच सदस्य लक्ष्मी पाळेकर, उषा चौधरी, वैशाली मोगरे, वसुंधरा दुर्गे, रेश्मा पाठारे, अनिता अंभुरे, नयना पैलकर आदींचे सहकार्य लाभत आहे.
‘‘महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, बचत गट, स्वयंरोजगार आणि कौशल्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून पावले उचलू,’’ असे आश्वासन नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिले.
‘‘महिलांना संधी, कौशल्य विकास आणि आर्थिक बळ मिळावे यासाठी भविष्यातही उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल,’’ असे महिला व बालकल्याण समिती सभापती स्वप्ना कदम म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

