मोशीत श्री नागेश्वर महाराज यांचा ‘भंडारा’

मोशीत श्री नागेश्वर महाराज यांचा ‘भंडारा’

Published on

मोशी, ता. १६ : शेकडो भाविकांना शाकभाजी, बुंदीचा महाप्रसाद वाटप करण्याची दीडशे वर्षांची परंपरा जपत सोमवारी (ता. १६) मोशीतील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या भंडारा उत्सवास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिरापासून अमराईपर्यंत महाराजांच्या पवित्र कलशाची टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये ग्रामप्रदक्षिणा घालत मिरवणूक काढण्यात आली.
आमराईतील तपोभूमीत अहोरात्र तेवणारा परमभक्तीचा नंदादीप, भंडारा उत्सवानिमित्त शेकडो क्विंटल महाप्रसाद घेणारे भाविक, असे चित्र दरवर्षी मोशीचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांच्या भंडाऱ्यात दिसत असते. यंदा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १६), मंगळवार (ता. १७) आणि बुधवारी (ता. १८) या काळात भंडारा, लिलाव, निकाली कुस्त्यांचा आखाडा, तिसऱ्या दिवशी श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव साजरा होणार आहे.
श्री नागेश्वर महाराज यांच्या समाधीच्या दिवशी म्हणजे माघ अमावास्येला सर्व गावकरी बुंदी, शाकभाजी हे अन्न शिजवून महाप्रसाद सेवन करतात. हा भंडारा मोशीकरांच्या जीवनातील एक महत्त्वाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. एकाचवेळी शेकडोच्या संख्येने भाविक त्याचा लाभ घेत असतात.

राज्यात लिलाव प्रसिद्ध
श्री नागेश्वर महाराज यांना अर्पण करण्यात आलेल्या मानानी ओटी, मानाचा विडा आणि मानाचे लिंबूफळ तसेच अन्य वस्तूंचा भंडाऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येतो. महाराजांचा आशीर्वाद म्हणून लाखो रुपयांची बोली लावून ग्रामस्थ श्री नागेश्वर महाराज यांना अर्पण करण्यात आलेल्या मानाची ओटी, मानाचा विडा आणि मानाचे लिंबूफळ घेतात. हा लिलाव राज्यात प्रसिद्ध असून तो पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. तिसऱ्या दिवशी श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सकाळी लोकनाट्य आणि सायंकाळी प्रसिद्ध पैलवानांच्या कुस्त्यांचा आखाडा भरविला जात असतो.

अखंड नंदादीप
श्री नागेश्वर महाराज यांच्या तपोभूमी असलेल्या आमराईत त्यांच्या एका परमभक्ताने अनेक वर्षांपूर्वी नंदादीप प्रज्वलित केला. आजही तेथील तो नंदादीप तेवत ठेवण्याची ही सेवा या कुटुंबातील सदस्यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे. शिवकालीन कलात्मक शिल्पकलेचा नमुना असलेल्या घडीव दगडांमध्ये तपोभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावर भंडारा उत्सवानिमित्त विविध फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.

पवित्र कलशाची मिरवणूक
श्री नागेश्वर महाराज मंदिर, मोशी प्रवेशद्वार व तपोवनभूमी येथे विद्युत रोषणाई, फुलांच्या माळांनी सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पहाटे श्री नागेश्वर महाराज यांच्या मूर्तीस देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या हस्ते महाअभिषेक, टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये मंदिरापासून अमराईपर्यंत ग्रामप्रदक्षिणा घालत पवित्र कलश मिरवणूक काढण्यात आली.

होम प्रज्वलित
अखंड तेवत असलेल्या नंदादीपाजवळ देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्या हस्ते पवित्र कलशाची स्थापना करुन होम प्रज्वलित करण्यात आला. महाआरती, पुरणपोळी व शाकबुंदीचा नैवेद्य दाखवण्यात आला. गावामध्ये सर्वत्र धामधूम, खेळण्यांचे विविध आवाज, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी, प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी पाहुण्यांची रेलचेल, मंदिर आणि आमराईत दर्शनासाठी केलेल्या रांगा असे चित्र होते.

MOS26B04230

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com