कुदळे उद्यानाची हिरवळ सुकली; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी...
मोशी, ता. २५ : कोणत्याही उद्यानाची ओळख ही त्यातील हिरवळ, झाडे, स्वच्छता आणि सुरक्षेवरुनच ठरते. मात्र मोशीतील कुदळे वस्ती परिसरातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुदळे उद्यानात देखभाली अभावी कोमेजले असून रात्रीच्यावेळी उद्यानात मद्यपींचे अड्डे रंगत आहेत.
काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या या उद्यानात देशी-परदेशी झाडे, औषधी वनस्पती, फुलझाडे व आकर्षक हिरवळ लावण्यात आली होती. मात्र उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची अवस्था दयनीय झाली आहे. ऐन उन्हाळा व वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्यान फुलांनी व हिरवळीने नटलेले असावे, अशी अपेक्षा असते. परंतु सध्या येथे सर्वत्र सुकलेली झाडे, पाणी न मिळाल्याने वाळलेले गवत आणि अस्ताव्यस्त परिसर दिसून येतो. दुपारच्यावेळेत गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक नसल्याने मद्यपींचे अड्डे येथे रंगतात, अशी तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.
कुदळे उद्यान आमच्या परिसरातील एकमेव विरंगुळ्याचे ठिकाण आहे. पण आज येथे ना हिरवळ आहे. ना मुलांना खेळायला खेळणी, ना सुरक्षितता. मुलांना खेळायला पाठवावे की नाही ? असा प्रश्न पडतो. महापालिकेने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उद्यानात औषधी झाडे, फुलझाडे, सावलीची झाडे, ठिबक सिंचन व्यवस्था, खेळाची साधने, चालण्यासाठी ट्रॅक, सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे नियोजन झाल्यास हे उद्यान पुन्हा एकदा नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.
- दीपक चव्हाण, मोशी
उद्यानातील झाडांना नियमित पाणीपुरवठा, खत व्यवस्थापन व छाटणी करण्यात येईल. लवकरच नवीन रोपे, नवीन हिरवळ लावून हिरवळ वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सुरक्षा व स्वच्छतेबाबतही उपाययोजना करण्यात येतील.
- राजेश ववसे, उद्यान निरीक्षक, उद्यान विभाग
MOS26B04241

