

मोशी, ता. ८ : मोशी प्राधिकरणातील स्वच्छ रस्त्यांवर काही श्वानप्रेमींकडून निष्काळजीपणे वर्तन होत आहे. पाळीव श्वानांना फिरायला आणताना त्याची घाण स्वच्छ न करता तेथून निघून जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिक संदीप पाटील म्हणाले, ‘‘श्वानाला फिरवणे चुकीचे नाही. मात्र त्यांनी केलेली घाण तिथेच सोडून जाणे अत्यंत गैर आहे. यामुळे दुर्गंधी पसरते आणि आरोग्यालाही धोका निर्माण होतो.’’
अर्चना देशमुख म्हणाल्या, ‘‘आम्ही रोज घरासमोर स्वच्छता ठेवतो. पण, काही जण मुद्दाम श्वानांना इथेच आणून शौच करायला लावतात. हटकले तर उलट वाद घालतात. ही सवय बदलली पाहिजे.’’
महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी देखील श्वानांची घाण उचलण्यास नकार देत आहेत. परिणामी, ही घाण रस्त्यावरच पडून राहते. पादचाऱ्यांचे नकळत पाय त्यात भरतात. वाहनांच्या टायरमुळे ती इतरत्र पसरते आणि तीव्र दुर्गंधी निर्माण होते.