

मोशी, ता. २५ : राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबईद्वारे २०२६ मधील शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक मंडळाच्यावतीने नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. यंदा या परीक्षा येत्या २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहेत. या परीक्षांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी विद्याथ्यांना प्रविष्ट करावे, असे आवाहन पुणे जिल्हा कलाध्यापक संघटनेने केले आहे.
दहावीच्या गुणांच्या सवलतीसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून शासकीय रेखाकला परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दहावीची टक्केवारी वाढविण्यासाठी सुवर्णसंधी आहे. ऑनलाइन नोंदणी आणि परीक्षा शुल्काचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय नियमांनुसार दहावीच्या बोर्ड परीक्षेत अतिरिक्त सवलतीचे गुण मिळतात. तसेच आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स आणि डिझायनिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत फायदेशीर ठरते. यंदा परीक्षा केंद्र, शाळा व विद्यार्थी नोंदणीसह शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे, असे संघटनेचे माजी प्रसिद्धी प्रमुख जगदीश कुंभार यांनी कळविले आहे.
परीक्षांचा तपशील...
- ऑनलाइन केंद्र व शाळा नोंदणी ः १० ते २० जुलै
- नियमित विद्यार्थी नोंदणी ः १० जुलै ते १० ऑगस्ट २०२६ (विनाविलंब शुल्कासह)
- विद्यार्थी नोंदणी विलंब शुल्कासह ः ११ ते २१ ऑगस्ट
- अतिविलंब शुल्कासह नोंदणी ः २२ ते ३० ऑगस्टपर्यंत
- ३० ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही
परीक्षेची रुपरेषा...
एलिमेंटरी परीक्षा (२८ व २९ सप्टेंबर) : वस्तुचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र आणि कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन. इंटरमिजिएट परीक्षा (३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर) : स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र आणि कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन.