

रावेत, ता. २५ : रावेत, वाल्हेकरवाडी, किवळे परिसरातील साधारणत: १५ ते १६ नाले आहेत. त्यांच्या साफसफाईचे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र स्पायडर मशीन उपलब्ध नसल्याने ५ ते ६ नाल्यांच्या सफाईचे काम काही भागांमध्ये रखडले आहे. मात्र नालेसफाईची कामे अपूर्ण राहिल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी निर्माण होत आहेत; तर काही ठिकाणी घरांत पाणी शिरत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. निगडी प्राधिकरण पेठ क्र. २४ व २५, रावेत गाव, भोंडवेबाग वस्ती परिसर, तुपे वस्ती, रावेत पंपिंग चौक आणि आकुर्डी गावातील गुरूदेवनगर, वाल्हेकरवाडी परिसरात पावसाचे पाणी नाल्यांऐवजी रस्त्यावरून वाहत आहे. काही ठिकाणी नाल्यांतील अडकलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. याशिवाय अनेक भागांमध्ये नाल्यांना पावसाच्या पाण्याच्या वाहिनी जोडल्याने नाले तुंबून पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
रावेत येथील स्थानिक रहिवासी सुनंदा माने म्हणाल्या, ‘‘नालेसफाई वेळेत होत नाही. त्याचा दरवर्षी पावसाळ्यात त्रास भोगावा लागतो. यंदा तर पाणी घरातच शिरले असून पावासाळ्यात तर घर बुडण्याची भीती वाटत आहे.’’
आकुर्डी गावातील स्थानिक रहिवासी संजय वाघ म्हणाले, ‘‘प्रशासनाने पावसाआधी सर्व नाले साफ करायला हवे होते. आम्हाला आता आरोग्याचा धोका वाढल्याची भीती वाटते.’’
महापालिका ‘अ’ विभागाचे उपाभियंता विजय कांबळे, मीनल डोडल म्हणाले, ‘‘नालेसफाई संदर्भातील कारवाई आरोग्य विभाग करत असते. स्थापत्य विभाग त्यांना आवश्यक ती मदत करत असून आम्ही आकुर्डीगाव, रामनगर, काळभोर नगर, मेहता हॉस्पिटल, कुटे हॉस्पिटल परिसरातील नालेसफाई केली आहे.’’
ब क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रावेत, वाल्हेकरवाडी, किवळे परिसरातील साधारणत: १५ ते १६ नाले आहेत. त्यांचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. स्पायडर मशीनच्या अनुपलब्धतेमुळे ५ ते ६ नाल्यांच्या सफाईचे काम काही भागांमध्ये रखडले आहे. स्थापत्य विभागाकडून ही मशीन उपलब्ध झाल्यास त्या भागांतील नाल्यांची तातडीने सफाई केली जाईल. सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याची वाहिनी स्वतंत्र करण्यासाठी वेगळा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल.
- सुधीर वाघमारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, ब क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.