

आमची सोसायटी आमचा उपक्रम
रुणाल गेट वे सोसायटी, रावेत
संजय चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
रावेत, ता.३१ ः रावेतमधील एका शांत आणि हरित परिसरात रुणाल गेट वे सोसायटी वसलेली आहे. ती आधुनिक तंत्रज्ञान आणि एआय संचालनयुक्त एक आधुनिक निवासी संकुल ठरली आहे. केवळ आधुनिक राहणीमान आणि सुविधांनीच नव्हे; तर सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक उत्सवांच्या आयोजनानेही ही सोसायटी नावारूपाला आली आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या पश्चिम भागात वसलेले रावेत हे एक वेगाने विकसित होणारे उपनगर आहे. याच रावेत परिसरात रुणाल गेट वे सोसायटी ही एक अग्रगण्य आणि आदर्श निवासी संकुल म्हणून ओळखली जाते. या सोसायटीत ४८६ सदनिका आणि ५१ बंगले मिळून दोन हजारांहून अधिक लोकवस्तीची आहे. आधुनिक वास्तुशिल्प, प्रशस्त सदनिका, क्लब हाऊस, उद्याने, खेळाचे मैदान आणि सुरक्षा व्यवस्था यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यातील काही सुविधांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
योगा सत्रे
नियमित योगा सत्रांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये रहिवाशांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रहिवासी प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने शिकतात. योगा सत्रे रहिवाशांना तणावमुक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात. विशेषतः तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा खूप फायदा होत आहे.
सामाजिक बांधलकी
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या दिवशी ध्वजारोहण समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा आणि देशभक्तीपर गीतांचे आयोजन केले जाते. स्थानिक रुग्णालये आणि रक्तपेढ्यांच्या सहकार्याने दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. दरवर्षी एक हजार पिशव्या रक्त संकलित केले जाते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम
सोसायटीत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, हलके व्यायाम सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहलींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक स्वतंत्र क्लब आहे. जिथे ते एकत्र येऊन गप्पा मारतात. खेळ खेळतात आणि त्यांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करतात.
एसटीपी, एसएसपी प्रकल्प
रुणाल गेट वे सोसायटी पर्यावरण संरक्षण आणि जलसंवर्धनाच्या बाबतीतही अग्रेसर आहे. सोसायटीने आपल्या परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि सॉलिड स्टेट प्रोसेसिंग (एसएसपी) प्रकल्प स्थापित केली आहेत. त्यासाठी सोसायटीने उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले आहे. त्याद्वारे पाण्याचा पुनर्वापर आणि कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले जाते. या प्रकल्पांमुळे सोसायटीत निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध केले जाते आणि त्याचा पुनर्वापर बागकाम आणि इतर गैर-पेय कामांसाठी केला जातो.
सण, उत्सव अन् खेळ
बॅडमिंटन कोर्ट आणि रिक्रिएशन हॉलमध्ये कौटुंबिक समारंभ आयोजित केले जातात. ‘रुणाल प्रीमियम लीग’ (आरपीएल) अंतर्गत पुरुष आणि महिला इनडोअर क्रिकेट खेळतात. महिला आणि मुलांसाठी नृत्य वर्ग, सर्व सण आणि जयंती उत्साहाने साजरी केली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सहली आणि वाढदिवस संगीत, नृत्यासह साजरे केले जातात. जलतरण तलावाचाही सदस्य आवर्जून वापर करत असतात.
आम्ही पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देतो. आमच्या एसटीपी (एसटीपी) आणि एसएसपी प्रकल्पांद्वारे पाण्याचा पुनर्वापर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे आमच्या सोसायटीचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी होतो. आम्ही शाश्वत भविष्यासाठी योगदान देतो.
- सुजित ठाकरे, चेअरमन, रुणाल गेटवे सोसायटी फेडरेशन
योगा सत्रे आमच्या रहिवाशांना तणावमुक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात. आमची सोसायटी भविष्यात आणखी नवीन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये सौरऊर्जेचा वापर, वृक्षारोपण मोहीम आणि डिजिटल शिक्षण उपक्रमांचा समावेश आहे.
- संजय अंबावणे, सचिव, रुणाल गेट वे सोसायटी फेडरेशन
आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सक्रीय आणि आनंदी ठेवणे हा आमचा प्राधान्याचा विषय आहे. त्यांच्यासाठी आयोजित केलेले उपक्रम त्यांना सामाजिकदृष्ट्या जोडून ठेवतात आणि त्यांचे जीवन समृद्ध करतात.
- अजय भसाले, कोषाध्यक्ष, रुणाल गेट वे सोसायटी फेडरेशन
आमची सोसायटी ही माझ्यासाठी एक कुटुंब आहे. योगा सत्रे आणि रक्तदान शिबिरे यासारखे उपक्रम आम्हाला एकमेकांशी जोडतात. आमचे पर्यावरणपूरक उपाययोजना अभिमानस्पद आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा आणि जगण्याची उमेद मिळते.
- अशोक लेनेकर, रहिवासी
आमच्या सोसायटीत मुलांना स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासारख्या उत्सवांमुळे खूप काही शिकायला मिळते. सोसायटीचे व्यवस्थापन खूप सहकार्य करते आणि आमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.
- संध्या काळे, रहिवासी
रुणाल गेट वे ही एक अशी सोसायटी आहे. जिथे प्रत्येक जण एकमेकांना मदत करतो. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे उपक्रम आणि पर्यावरण संरक्षणाचे प्रयत्न यामुळे आमची सोसायटी खास आहे.
- विजय मोहोरे, रहिवासी
नवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांवर सोसायटीचे व्यवस्थापन समिती नेहमीच लक्ष देत असते. जेणेकरून रहिवाशांना अधिक चांगले जीवनमान मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
- गिरीश लाड, सदस्य, रुणाल गेट वे सोसायटी फेडरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.