वारकऱ्यांना आईच्या मायेने भाजी-भाकरी

वारकऱ्यांना आईच्या मायेने भाजी-भाकरी

Published on

संजय चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
निगडी, ता.१९ ः संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आकुर्डीतील लातूर जिल्हा मंडळ, नवनाथ मित्र मंडळाकडून ग्रामस्थांच्या सहकार्याने मनोभावे सेवा केली जात आहे. गावठाणातील गृहिणी घरी भाजी, भाकरी तयार करून मोठ्या मायेने वारकऱ्यांसाठी देत असतात. ही भाजी-भाकरी केवळ अन्न नाही; तर ती परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा मिलाफ असल्याची भावना ग्रामस्थांची आहे.
आकुर्डीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामी येत आहे. त्यामधील वारकऱ्यांसाठी लातूर जिल्हा मंडळाकडून गेल्या ४२ वर्षांपासून विनामूल्य भोजन सेवा दिली जात आहे. आकुर्डी, निगडी आणि प्राधिकरण गावठाण येथील नागरिक या उपक्रमात सक्रीय सहभागी होत दरवर्षी सुमारे १२ हजार पोळ्या आणि भाकरी तयार करून देतात. याशिवाय, मंडळाच्यावतीने ५०० किलो भाजी तयार करून वारकऱ्यांना दिली जाते.
आकुर्डीतील नवनाथ मंडळ देखील २४ वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत पाडळे यांच्या नेतृत्वाखाली आणि आकुर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने अन्नदान, निवारा, पाणी, स्नानगृह, वैद्यकीय सेवा वारकऱ्यांना प्रदान केल्या जात आहेत. या उपक्रमात आप्पा बागल, तुकाराम बागल यांच्यासह ओम निकम, सुमीत बागल, आदित्य शिवणेकर, आदित्य भोसले, ऋषिकेश सोलम हे कार्यकर्ते या सेवेची परंपरा पुढे नेत आहेत.

यावर्षीही कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन या महाप्रसादाची तयारी केली. मोठ्या प्रमाणावर पोळ्या, भाकरी आणि भाजी तयार करून वारकऱ्यांचे आदरातिथ्य केले गेले. त्याने वारीतील थकलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. वारकरी संप्रदायातील एकोपा आणि लोकसहभाग यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे. जो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.
- नंदकिशोर गुंजोटे, अध्यक्ष, लातूर जिल्हा मित्र मंडळ

वारकऱ्यांना भोजन दिल्यानंतर नवनाथ चौकात भारुड व भजनाचा कार्यक्रम होतो. पहाटे स्नान व अल्पोपहार दिल्यानंतर ते पुण्याकडे मार्गस्थ होतात. ही सेवा करताना आम्हाला समाधान आणि विठ्ठलाची अनुभूती मिळते. वारीच्या भक्तिरसात आकुर्डीगाव सेवाभाव, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण घडवत आहे. नवनाथ मंडळाचे कार्य हे वारी इतकेच पवित्र आणि प्रेरणादायी ठरत आहे.
- अनिकेत पाडळे, अध्यक्ष, नवनाथ मंडळ


PNE25V24180

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com