सेवा रस्ता ‘खड्ड्यात’; वाहतूक कोंडीने मनस्ताप

सेवा रस्ता ‘खड्ड्यात’; वाहतूक कोंडीने मनस्ताप

Published on

रावेत, ता.४ : पवना नदीवरील पूल, समीर लॉन्स ते मुकाई चौक या दरम्यानच्या सेवा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यात पाणी साचत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेकवेळा महापालिकेकडे तक्रार केली. पण, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या रस्त्याचा वापर दररोज हजारो दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक करणारी अवजड वाहने करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे वाहन अपघातग्रस्त प्रसंगी रस्त्यातच नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. सार्वजनिक वाहतूकही विस्कळीत झाली असून पीएमपी बसेसने या मार्गावर प्रवास करणे धोकादायक, गैरसोयीचे आणि वेळखाऊ झाले आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांचे ब्रेक अचानक लावावे लागतात. त्यामुळे मागून येणारी वाहने धडकण्याचा धोका असतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. काही वेळा अंधारात आणि पावसात हे खड्डे दिसत नसल्याने मोठे अपघातही घडतात, असे येथील नागरिकांनी सांगितले.

‘‘महापालिकेने तातडीने पवना पूल ते मुकाई चौक या दरम्यानच्या सेवा रस्त्याची दुरुस्ती करावी. रस्त्यावर दर्जेदार डांबरीकरण करावे. तसेच नियमित देखभाल व्यवस्था ठेवावी,’’ अशी मागणी रावेत, किवळे, विकासनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या रस्त्यावरून चालवताना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. सकाळी आणि सायंकाळी गर्दीत, तर खड्ड्यांमधून जाणे म्हणजे धोका पत्करण्यासारखे आहे.
- संदीप शिंदे, वाहनचालक

पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साठते आणि रस्त्याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे वृद्ध आणि महिला पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. सकाळी मुलांना शाळेत सोडताना, तेथून आणतात अनेक अडचणी येतात. महापालिकेने या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी.
- आशा माने, स्थानिक नागरिक, रावेत

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचे कामे सुरू केली आहेत. पावसाळा असल्यामुळे तात्पुरती खडी भरून काम करण्यात येत आहे. पुनावळे ते मुकाई चौकापर्यंतच काम सुरू आहे. सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पुनावळ्यापासून कामे सुरू केली आहेत.
- सुभाष गंटे, वरिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

उद्या सकाळी खड्डे भरून घेणार आहोत. पावसाळा थांबल्यानंतर डांबरीकरण इतर कामे केले जातील. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे काम सुरू आहे, कामे लवकर पूर्ण होतील.
- विक्रम पाटील, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

NGI25B00599

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com