रावेतच्या शिंदे वस्ती परिसरात खड्डे
रावेत, ता. ३ : शिंदे वस्ती, एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत. पदपथाची अयोग्य उंची आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका यावर नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत दखल घेऊन प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शिंदे वस्ती परिसरात रस्त्याची आणि पदपथांची उंची एकसंध नाही. पदपथ चालण्यासाठी अयोग्य ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना मोठा त्रास होत आहे. त्याचबरोबर, पदपथावर चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे बेकायदेशीर पार्किंगही मोठ्या प्रमाणात होत असून काही वाहने रस्त्यावर असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हे विशेषतः शालेय बससाठी अधिक धोकादायक बनले आहे. सध्या परिसरात विविध बांधकामे सुरू असल्याने अनेक डंपर, पाण्याचे टँकर इत्यादी मोठ्या वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तर रस्त्याची उंची एकसलग नसल्याने अपघाताचे प्रकार घडत आहेत. याबाबत
नागरिकांनी याबाबत ‘सारथी’ प्रणालीवर अनेकदा तक्रारी नोंदवल्या. परंतु, केवळ प्रक्रियेत आहे; निविदा सुरू आहे असे उत्तर मिळते. मागील एक वर्षापासून हीच स्थिती असून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. काही तक्रारी निकाली होऊनही प्रत्यक्षात कोणतेही बदल झालेले नाहीत, यावरही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अनेक नागरिक पदपथाखाली वाहने उभी करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो आणि वाहतूक कोंडी होते. रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना त्रास होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.’’
- हितेश रहांगडाले, स्थानिक नागरिक
यासंदर्भात आम्ही काम करत आहोत. पावसाळा सुरू असल्याने अडचण निर्माण होते आहे. लवकरच रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल.
- चंद्रकांत मुठाळ, कार्यकारी अभियंता (स्थापत्य)