रुणाल गेटवे सोसायटीसमोरील रस्त्याचे डांबरीकरण अखेर पूर्ण
रावेत, ता. ५ ः रावेत आणि किवळे गाव येथील रुणाल गेटवे, रुणाल स्पेशिओ, ग्लोरिया आणि जीटी प्राइड या प्रमुख सोसायट्यांच्या समोरील मुख्य रस्त्याचे अखेर डांबरीकरण करण्यात आले.
गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सोसायट्यांचे रहिवासी त्रस्त होते. रस्त्यावर ठिकठिकाणचे खड्डे, साचलेला चिखल आणि पावसामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय झाली होती. दैनंदिन प्रवासात अडचणींना सामोरे जावे लागत होते. शिवाय अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता.
या समस्येच्या विरोधात रुणाल गेटवे सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी चिखलात बसून आंदोलन केले होते. त्याची अखेर महापालिका प्रशासनाला दखल घ्यावी लागली.
रुणाल गेटवे सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक राजेंद्र मिरगल म्हणाले, ‘‘आम्ही वारंवार तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि रस्त्यावर बसून आंदोलन केले. आमच्या एकतेच्या शक्तीमुळेच प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला.’’
NGI25B00723