सामाजिक प्रबोधनपर देखावे, सजावट अन् रोषणाई
रावेत/निगडी, ता. ३ : निगडी, आकुर्डी आणि प्राधिकरण परिसरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक सजावटीबरोबरच सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले आहेत. या मंडळांपैकी काहींनी पर्यावरण रक्षणावर भर देत प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण आणि पाणी बचत याबाबत जनजागृती केली आहे. काही मंडळांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे देखावे सादर केले; तर काही ठिकाणी पौराणिक कथा आणि धार्मिक प्रसंगांवर आधारित सजावट साकारण्यात आली आहे.
समाजासाठी अभिनव आणि संवेदनशील उपक्रम राबविणे हे देखील अनेक मंडळांचे वैशिष्ट्य ठरले आहे. काही मंडळांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली; तर काहींनी ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ या संकल्पनेवर विशेष मोहीम हाती घेतली आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच लहान मुलांसाठी बाळगाणी, खेळ आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रम घेण्यात आले.
पद्मनाभ स्वामी मंदिर
निगडीतील यमुनानगर येथील सुवर्णयुग गणपती मंडळातर्फे यंदा केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. सुंदर कलाकुसरीसह सजविलेला हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
मंडाळाचे हे ३२ वे वर्ष आहे. विवेक गवळी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
बल्लाळेश्वर मंदिर
यमुनानगरमधील शिवराज तरुण मित्रमंडळातर्फे पाली येथील प्रसिद्ध बलाळेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. आकाश शेंडे हे अध्यक्ष आहेत. भजन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी आयोजित करण्यात आले.
विठ्ठल महाल
यमुनानगर येथील गजराज मित्र मंडळाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ऋषिकेश गुंजाळ हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. मंडळातर्फे विविध सांस्कृतिक आणि खेळ आयोजित करण्यात आले.
संभाजी महाराज महाल
यमुनानगर येथील सिद्धिविनायक मित्र मंडळाचे यंदाचे १८ वे वर्ष आहे. मंडळातर्फे यंदा संभाजी महाराज महाल देखावा सादर करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर पुरोहित हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
आकर्षक सजावट
निगडीतील टिळक चौक येथील जय भवानी तरुण मंडळाकडून यावर्षी आकर्षक सजावट आणि भव्य देखावा उभारण्यात आला आहे. सुंदर आरास पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.
मातृभाषा संवर्धन
निगडी गावठाण येथील शिवछत्रपती मित्र मंडळाचे यंदा ३० वे वर्ष आहे. ‘भाषेची प्रगती-मातृभाषेची अधोगती’ या विषयावर जिवंत देखाव्यातून भाविकांसमोर मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली जात आहे. मंडळाचे संस्थापक रामकृष्ण बाबर असून कृणाल काळभोर अध्यक्ष आहेत.
मारुतीची उंच मूर्ती
निगडी प्राधिकरणातील पेठ क्र. २४ येथील ओम शिवतेज मित्र मंडळातर्फे यंदा २५ फुटांची मारुतीची स्थिर मूर्ती देखावा म्हणून साकारण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष समीर जावळकर आहेत.
शिश महाल
निगडी गावठाणमधील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या जय बजरंग तरुण मंडळातर्फे यंदा शिश महाल आणि आकर्षक सजावटीचा देखावा उभारण्यात आला आहे. मंडळाचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. दत्तात्रेय पवळे हे अध्यक्ष आहेत.
शंकराची स्थिर मूर्ती
निगडी प्राधिकरणातील मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखले जाणारे सिंधुनगर युवक मित्र मंडळ यंदा ४७ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाचा शंकराची स्थिर मूर्ती हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मंडळाचे अध्यक्ष योगेश पवार आहेत.
आकर्षक आरास
निगडी प्राधिकरण येथे वरद प्रतिष्ठानतर्फे स्थापित उद्घोष गणेश मित्र मंडळाने यंदाही आकर्षक सजावट केली आहे. सुंदर मूर्तीची आरास आणि आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
नेत्रदीपक रोषणाई
प्राधिकरणातील पेठ क्र. २८ मधील जयहिंद मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष राजेश फलके आहेत.
शिवरायांचा राज्याभिषेक
आकुर्डी गावठाण येथील सिद्धिविनायक मित्रमंडळ, कालिका प्रतिष्ठान, आकुर्डीतर्फे यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा देखावा साकारण्यात आला आहे. रायगड किल्ल्याची पार्श्वभूमी, राजदरबाराचे दृश्य आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यामुळे मंडपाला इतिहासकालीन स्वरूप लाभले आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई
आकुर्डीतील दत्तवाडी येथील श्री दत्त तरुण मंडळातर्फे आकर्षक विद्युत रोषणाई सजावट तसेच सुंदर मंडप उभारण्यात आला आहे. रंगीबेरंगी प्रकाश योजना, देखणे शिल्पसजावट आणि कलात्मक रचनांमुळे मंडप विशेष आकर्षण ठरत आहे.
मोरपिसांचा देखावा
आकुर्डी गावठाणातील दत्तवाडी येथील समर्थ मित्र मंडळाचे यंदाचे ४९ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने आकर्षक मोरपिसांचा देखावा साकारला आहे. त्याच्या भवती आकर्षक विद्युत व्यवस्थेच्या माध्यमातून भव्यता आणि कलात्मकता साकारली आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई
आकुर्डी गावठातील उर्सुला शाळे समोरील योगायोग मित्र मंडळातर्फे यावर्षीचा गणेश मूर्तीचा आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा साकारला आहे. मंडळाकडून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाते.
लखलखती विद्युत रोषणाई
आकुर्डी येथील नवनाथ मित्र मंडळाने यंदा आकर्षक विद्युत रोषणाई साकारली आहे. रंगीत दिव्यांची चमचम व सुंदर सजावटीमुळे मंडप अधिक आकर्षक भासत आहे.
पावनखिंडीचा रणसंग्राम
आकुर्डी गावठाणातील नागेश्वर मित्र मंडळाने यंदा ऐतिहासिक पावनखिंड युद्धाचा जिवंत देखावा साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारा हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सजावट, प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या जिवंत सादरीकरणामुळे प्रेक्षकांना इतिहासाचा थरारक अनुभव मिळतो.
समाजप्रबोधनपर देखावा
आकुर्डी गावठाणातील हनुमान तरुण मित्र मंडळाने यंदा समाजप्रबोधनपर जिवंत देखावा साकारला आहे. समाजप्रबोधन आणि ऐतिहासिक घटनांचे दर्शन घडविणाऱ्या या देखाव्यात स्थानिक तरुण कलाकारांनी सहभाग घेतला आहे. प्रभावी सादरीकरण, आकर्षक प्रकाशयोजना व सजावटीमुळे प्रेक्षकांची गर्दी होत आहे.
जीवघेणे प्रेम
आकुर्डी गावठाण येथील भैरवनाथ मित्र मंडळाने (वडखालचा गणपती) जीवघेणे प्रेम हा जिवंत देखावा सादर केला आहे. प्रेमसंबंधातील वास्तव, त्यातील संकटे आणि समाजातील जागृती यावर आधारित संदेश देण्यात आला आहे.
गड आला, पण सिंह गेला
आकुर्डी येथील जय हनुमान क्रीडा व शिवराज मित्र मंडळाने यंदा ‘गड आला पण सिंह गेला’ हा जिवंत देखावा साकारला आहे. तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित हा देखावा प्रकाशयोजना, ध्वनीफीत आणि जिवंत कलाकारांच्या अभिनयातून साकारला असून प्रेक्षकांना थरारक अनुभव देतो.
स्त्रीशक्ती सन्मानाचा संदेश
आकुर्डी गावठाणातील शिवशक्ती चौक येथील शिवशक्ती गणेश मित्र मंडळाने यंदा ‘स्त्री शक्तीचा करा, हो सन्मान’ या संदेश व स्वामी समर्थांचा देखावा सादर करून सामाजिक भान आणि आध्यात्मिकतेचा संगम घडवला आहे. मंडळाचे अध्यक्ष पंढरी थरकुटे आहेत.
स्वामी समर्थ दर्शन
आकुर्डी गावठाणातील महानगरपालिकेच्या प्रभाकर कुटे रुग्णालया समोरील जयराष्ट्र मित्र मंडळाने स्वामी समर्थांची भव्य मूर्ती साकारली असून भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी भजन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दीपक काळभोर हे अध्यक्ष आहेत.
तिरुपती बालाजी मंदिर
आकुर्डी येथील फोर्स मोटर्स समोरील मनपा शाळेच्या मैदानावर तरुण मित्र मंडळ प्रणित सद्भावना प्रतिष्ठान यंदा ६१ वे वर्ष साजरे करत आहे. मंडळाने यंदा देखाव्यात ८५ फूट उंच व ४० फूट रुंद हुबेहुब बालाजी मंदिर साकारले आले असून गाभारा तब्बल ६५ फूट आहे. उल्हास शेट्टी मंडळाचे अध्यक्ष आहेत.
स्त्री काल, आज आणि उद्या
विठ्ठलवाडी, आकुर्डी येथील श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळातर्फे ‘स्त्री काल आज आणि उद्या’ हा देखावा साकारला आहे. महिलांची जडण-घडण आणि आयुष्यातील संघर्ष दाखविण्यात आला आहे. यंदा मंडळाचे ३५ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सूर्यवंशी हे आहेत.
रावण वध
आकुर्डीतील तुळजाई वस्ती येथील श्री तुळजामाता मित्र मंडळाचे यंदाचे ४९ वे वर्ष आहे. मंडळाने रावण वध हा पौराणिक देखावा साकारला असून भगवान श्रीराम, लक्ष्मण, हनुमान आणि रावण यांच्या मूर्ती उभारण्यात आल्या आहेत. या देखाव्यातून सत्याचा असत्यावर विजय हा संदेश प्रभावीपणे दिला जात आहे. यश काळभोर हे अध्यक्ष आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाई
आकुर्डीतील विठ्ठलवाडी परिसरातील गणेश कामगार मित्र मंडळाचे हे ५६ वे वर्ष आहे. मंडळाकडून यंदा आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अध्यक्ष शाम तरटे आहेत.
सामाजिक उपक्रम
आकुर्डी येथील अर्जुन मित्र मंडळ ट्रस्टने यंदा रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण आयोजित केले आहे. प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रुपयांचा अपघात विमा तसेच विविध संरक्षण योजनांचा लाभ दिला जातो. मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील आहेत.
फुलांची सजावट
आकुर्डी गावठाणातील अखिल अष्टविनायक मित्र मंडळाचे यंदा १८ वे वर्ष आहे. यावर्षी मंडळाने आकर्षक फुलांची सजावट करून भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंडळाचे अध्यक्ष शुभम वायकर आहेत.
संभाजी महाराजांचे शौर्य
निगडी प्राधिकरण येथील शरयुनगर युवक प्रतिष्ठान ४४ व्या वर्षात प्रवेश करत असून यंदा संभाजी महाराज यांच्या जीवनावरील जिवंत देखावा साकारला आहे.
शिवशाही ते लोकशाही
आकुर्डी येथील हनुमान तरुण मंडळाने ‘शिवशाही ते लोकशाही’ हा देखावा साकारला आहे. देखाव्यातून शिवरायांच्या कार्याचा प्रभाव आणि आजच्या लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.