मोरे महाविद्यालयामधील रोजगार मेळावा उत्साहात
निगडी, ता. २० ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आकुर्डीतील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि समर्थनम् ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. सहभागी सर्व दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, तसेच मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी मेळाव्यासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे म्हणाले, “या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना करियरसाठी अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास उपक्रमांचा तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. यात १०१७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यापैकी १२१ विद्यार्थी दिव्यांग आहेत. समर्थनम् ट्रस्टतर्फे दिव्यांगांना शिष्यवृत्तीही उपलब्ध करून देण्यात आली. त्यांना सांकेतिक भाषेतून मार्गदर्शन करण्यात आले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. संतोष जगताप यांनी प्रास्ताविक केले. समर्थनम् ट्रस्टचे प्रशिक्षण प्रमुख साईराज यादव आणि मुंबई केंद्र प्रमुख अमोल हराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. एच. बी. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. राठोड, प्रबंधक संजय झेंडे यांचे मेळाव्यास सहकार्य लाभले. डॉ. स्वाती जगताप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धनश्री खटावकर यांनी आभार मानले.
अंतिम वर्षातील १२० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यात आली. विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येतील.
-----

