ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या पालकांचे ‘आरोग्यव्रत’
निगडी, ता.२० : ‘चालत राहा थांबू नका’ ही प्राचीन पण कालातीत शिकवण प्रत्यक्ष कृतीत देण्यात आली. समाजात वाचन संस्कृती रुजावी, सजग व सशक्त नागरिक घडावेत आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या पालक संघाच्यावतीने ‘चालण्यातून उमललेले आरोग्य संस्कार’ हा उपक्रम राबविण्यात आला. वॉकेथॉन (आरोग्यव्रत) द्वारे त्याची सांगता झाली.
या उपक्रमासाठी ४०० हून अधिक पालकांनी नोंदणी करून आरोग्याचा संकल्प केला. आरोग्यव्रताच्या प्रारंभी पालकांची रक्त तपासणी, सहनशक्ती व लवचिकता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर पुढील दोन महिने पालकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम केला. या कालावधीत आयोजित तज्ज्ञांनी उद्बोधनपर सत्रात मार्गदर्शन केले.
या वॉकेथॉनमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी, युवक-युवती आणि परिसरातील नागरिक अशा २५०० पेक्षा अधिक जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. चालण्यातील प्रत्येक पाऊल केवळ अंतर मोजणारे नव्हते, तर आरोग्य, शिस्त आणि सामूहिकतेची भावना रुजवणारे होते.
वडगांव मावळचे मुख्याधिकारी प्रवीण निकम, अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, टाटा ट्रस्टच्या सदस्या नीलम देसाई, आमदार उमा खापरे, नवनिर्वाचित नगरसेवक अमित गावडे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, लायन्स क्लबचे योगेश वाके, राजेश अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाचे प्रमुख म्हणून अमित गांगुर्डे यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली १५० हून अधिक पालक स्वयंसेवकांनी विविध विभागांमध्ये उत्साहाने काम केले. केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांचे मार्गदर्शन या संपूर्ण उपक्रमाला दिशा देणारे ठरले. पालक महासंघाचे समन्वयक अनुजा बनाळे, कैलास दंडगव्हाळ आणि पंकज चापोलीकर यांनी संपूर्ण उपक्रमाचे नियोजन केले.
एकंदरीत वॉकेथॉन केवळ एक कार्यक्रम न राहता आरोग्य, वाचनसंस्कृती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेल संगम ठरले. चालताना घडलेली ही यात्रा, संस्कारांची पेरणी करणारी आणि उद्याच्या निरोगी समाजाची पायाभरणी करणारी ठरली, अशी माहिती संयोजकांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

