

निगडी, ता. १६ ः ‘‘देशात संवेदनशीलतेचा दुष्काळ जाणवत असला तरी कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता माणुसकीला दिलासा देणारी आहे,’’ असे मत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि सुनेत्रा महिला प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित काव्यजागर आणि सन्मान सोहळ्यात डाॅ. सबनीस बोलत होते. टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर अध्यक्षस्थानी होते. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव जयवंत बागल आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे यांना मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान आणि ज्येष्ठ पत्रकार डाॅ. विश्वास मोरे यांना पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार देऊन सन्मानित केले.
डाॅ. सबनीस म्हणाले, ‘‘संत आणि सामान्यांतील भलेपणावर आपली संस्कृती टिकून आहे. सुर्वेंची कविता संस्कृतीच्या संचिताचा विकास करते, म्हणून त्यांच्या स्मृतींचा सन्मान करणे औचित्यपूर्ण आहे. सुर्वे यांचे विचार मानवतेची सर्वोच्च उंची गाठणारे आहेत.’’
पारळकर म्हणाले, ‘‘साहित्यासारखे क्षेत्र नाही, लेखणीसारखे शस्त्र नाही आणि वाणीसारखे अस्त्र नाही.’’ पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.
सुर्वे यांच्या कवितांचा जागर
काव्यजागर संमेलनात राजेंद्र वाघ, संगीता झिंजुरके, रजनी कानडे, कुमार खोंद्रे, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, वर्षा बालगोपाल, सीमा गांधी, विनिता श्रीखंडे, सारंग पोटफोडे, सुभाष चव्हाण यांनी नारायण सुर्वे यांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे अभिवाचन केले. मानसी चिटणीस यांनी निवेदन केले. ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांचा प्रातिनिधिक सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.