
‘रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्यासाठी चळवळ हवी’
जुनी सांगवी, ता. १९ ः अपघात टाळण्यासाठी पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने जावे. समोरून येणारे वाहन दिसून येत असल्याने स्वतःचा बचाव करणे सोपे जाते. त्यामुळे उजव्या बाजूने चालण्याबाबत विविध समाज माध्यमातून चळवळ उभारण्याची गरज आहे. नांदेड शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातही पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, परिवहन अधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘वॉक ऑन राईट’बाबत नागरिकांना परावृत्त करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.
भारतामध्ये रस्त्याने चालताना सहसा पादचारी डाव्या बाजूने चालतात. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात होऊन मृत्यू ओढवतो. रस्त्यांच्या उजव्या बाजूने चालल्यास समोरून येणाऱ्या वाहनाचा निश्चित अंदाज बांधून सुरक्षितता घेता येऊ शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रशासकीय यंत्रांबरोबरच स्वयंसेवी संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वॉक ऑन राईट’ मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे, असेही जगताप यांनी नमूद केले.