श्रमिकांची औद्योगिकनगरी

श्रमिकांची औद्योगिकनगरी

महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे १९६० रोजी झाली. तेव्हापासून एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, तर याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो‌. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला सहा दशके पूर्ण झाली. या काळात महाराष्ट्राने कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती केली. महाराष्ट्रातील अनेक शहरालगत औद्योगिक क्षेत्रे निर्माण केली गेली. त्यापैकी पिंपरी -चिंचवड हे महत्त्वपूर्ण औद्योगिक क्षेत्र आहे. श्रमिकांची औद्योगिकनगरी अशी शहराची ओळख निर्माण झाली आहे.
- श्रीकांत चौगुले

पिं परी-चिंचवड शहराची निर्मिती औद्योगीकरणामुळेच झाली. उद्योजकांच्या गुंतवणुकीवर आणि श्रमिकांच्या श्रमावर या शहराची वाढ, विकास आणि भरभराट झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातचा काही भाग यांचे मुंबई हे द्विभाषिक राज्य होते. याच काळात संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरत होती‌. मुंबईचा महाराष्ट्रात समावेश होणार की गुजरातमध्ये असा संभ्रम निर्माण झाला होता. त्या काळात मुंबईतील अनेक कारखाने मुंबईबाहेर स्थलांतरित होत होते. मुंबई बाहेर पडणाऱ्या उद्योगांना योग्य जागा आणि सोयी सुविधा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यातून अनेक मोठे उद्योग पिंपरी-चिंचवड भागात आले. दापोडीतील सँडविकपासून एस. के. एफ., इन्वेस्टा मशिन टूल्स अशा अनेक कंपन्यांनी स्वतः जागा घेऊन येथे उद्योग सुरू केले. १९६१ मध्ये बजाज ऑटो आकुर्डी येथे सुरू झाली. १९६२ ला एमआयडीसीची स्थापना झाली. त्यानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी या भागातील ३६०० एकर जागा संपादित करून औद्योगिक भूखंड विकसित केले गेले. उद्योजकांसाठी शेड उभारल्या. सुंदर नियोजन, औद्योगिक वातावरण, वाहतुकीच्या सोयी सुविधा. यामुळे टेल्को व इतर अन्य मोठ्या कंपन्या या भागात आल्या.

१९७० च्या दशकात औद्योगीकरणामुळे रोजगार उपलब्ध झाला. कामगार, तंत्रज्ञ, व्यावसायिक या सर्वांनाच इथे संधी उपलब्ध झाली. महाराष्ट्राच्या सर्व भागातून व देशातून लोक रोजगार काम धंद्यासाठी येऊ लागले. औद्योगिक क्षेत्रात सोयी सुविधांची कमतरता असल्याने बहुतांश लोक पुणे शहर परिसरात राहत असत. पुणे शहरावरचा हा वाढता ताण कमी करण्यासाठी आणि औद्योगिक परिसरातच नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या चार ग्रामपंचायती विसर्जित करून चार मार्च १९७० रोजी पिंपरी-चिंचवड नवनगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिकनगरी, कामगारनगरी असे म्हणतात. या भागात सुरुवातीला बहुतांश कारखाने आणि कामगारांचीच वस्ती अधिक होती, त्यामुळे ही विशेषणे प्राप्त झाली. मुळात पिंपरी चिंचवड परिसरात उद्योग सुरू होण्यामागे या भागातील औद्योगिक पार्श्वभूमी उपयोगी ठरली. पुणे शहराच्या दक्षिण आणि पश्चिमेला डोंगराळ भाग, पूर्वेला सुपीक जमीन तर दक्षिणेला डोंगर मात्र उत्तरेला जागेची उपलब्धता, वाहतुकीच्या सोयी .यामुळे पुणे शहराच्या उत्तरेला औद्योगीकरणाला आधीच प्रारंभ झाला होता. दापोडीत पीडब्ल्यूडी वर्कशॉप, एसटी वर्कशॉप सुरू झाले होते. त्याच्याच पुढच्या टप्प्यात पिंपरी येथे १९५४ मध्ये एचए कंपनी सुरू झाली. त्यानंतर या भागात कंपन्या यायला सुरुवात झाली. एमआयडीसीच्या स्थापनेनंतर त्याला अधिक गती मिळाली. औद्योगिक क्षेत्र विकसित झाले. ९० च्या दशकात या भागातील उद्योगधंदे एकदम भरभराटीला होते. १९९१ ला जागतिकीकरणाचा करार केला गेला आणि बाहेरच्या उद्योगांनी भारतात प्रवेश केला. परदेशी वाहन कंपन्या भारतात आल्या आणि पिंपरी चिंचवडच्या औद्योगिकरणाला ओहोटी सुरू झाली. स्पर्धेत टिकायचे तर कमी खर्चात उत्पादन केले पाहिजे म्हणून मग उत्पादनावरचा खर्च कमी करायचा तर अन्य ठिकाणी उद्योग स्थलांतरित केले पाहिजेत, अशी भावना निर्माण झाली. काही उद्योग शहराबाहेर जायला सुरुवात झाली. त्यानंतर काहींनी जवळच्या चाकण एमआयडीसीमध्ये आपले उत्पादन सुरू केले. एकंदर यंत्रावर अवलंबून असणाऱ्या उद्योगाला गळती निर्माण झाली. पण याच काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा क्षेत्रातील नवीन कंपन्या शहरात सुरू झाल्या. हिंजवडी, तळवडे या ठिकाणी आयटी पार्क निर्माण झाले. रोजगाराच्या आणि चांगल्या
पगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या. पुन्हा एकदा शहराच्या विकासाला चांगली गती मिळाली.

कामगार जीवन
पुणे शहराच्या औद्योगीकरणाची गंगोत्री असणाऱ्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये महायुद्ध काळात २२००० कामगार होते. परिसरातील गावातील लोकांना तिथे नोकरीची संधी मिळाली होती. नंतरच्या काळात अन्य कंपन्या सुरू झाल्यानंतर तिथेही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना औद्योगिक पट्ट्यात लगेचच नोकरी मिळत असे. १९७२ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. मराठवाड्यातून व अन्य भागातून अनेक लोक स्थलांतर होऊन पिंपरी चिंचवड परिसरात आले. त्यांना शहराने सामावून घेतले, रोजगार दिला.
१९७० ते १९९० हा कालखंड उद्योग आणि कामगार यांच्यासाठी उत्तम काळ होता. भरभराटीचा काळ होता. देशी उद्योगांना पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी होती. बजाज व टेल्को यांची तर वाहन उद्योगात मक्तेदारी होती. त्यामुळे त्यांच्या वाहनांना पर्याय नसायचा. दुचाकी वाहनांमध्ये तर बजाजच्या स्कूटरला इतकी मागणी होती की बुकिंग केल्यावर अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागायची. काही लोक तर वाहनाच्या किमती इतकीच अधिकची किंमत देऊन लवकर स्कूटर मिळवत. अशा काळात कामगारांचाही पगार इतरांच्या तुलनेत अधिक होता. याच काळात सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा कंपनीतील कामगारांचा पगार अधिक होता. त्यामुळे या काळात कामगार वर्गाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. अशातच नाष्टा, भोजन मिळते, जाणे येण्याची सोय होते. ओव्हरटाईमचे अधिक पैसे मिळतात. या सगळ्यामुळे ग्रामीण भागातील आलेल्यांसाठी अशा मोठ्या कंपन्यांतील नोकऱ्या म्हणजे स्वप्नपूर्तीच वाटायचे. याच काळात कंपन्यांमधील कामगारांची संख्या अधिक होती. कंपनीतील शिफ्ट संपली की कामगारांची वाहतूक करणाऱ्या गाड्या एकाच वेळी सुटायच्या. त्यामुळे सलग एकाच कंपन्यांच्या दहा वीस गाड्या रस्त्यावरून जाताना दिसायच्या. हा काळ मोठे उद्योग त्यावर आधारित छोटे उद्योग यांच्यासाठी चांगला होता. याच काळात कामगारांनी परिसरात गुंठा दोन गुंठे जागा घेऊन घरे बांधली आणि शहराची वाढ होत राहिली. सुरुवातीच्या काळात बहुसंख्य कामगारांचे वास्तव्य असल्यामुळे कामगार नगरी अशी ओळख प्राप्त झाली होती.
१९९० नंतर मात्र कामगार कपात, कंत्राटी कामगार भरती, उद्योगांचे स्थलांतर अशा अनेक कारणांमुळे यंत्रांवर आधारित कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत गेली. नंतर माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील संधी उपलब्ध झाल्याने तशा प्रकारची कामे करणाऱ्या कामगारांची संख्या वाढली. त्याचमुळे पिंपळे सौदागर, वाकड कस्पटेवस्ती इत्यादी शहराचा भाग अधिक विकसित झाला.
कारखान्यातील संघटित कामगारांच्या हक्कासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबर सेवाक्षेत्रही विस्तारले. भाजी दूध अशा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यापासून, घरकाम स्वच्छता इत्यादींपर्यंत काम करणारे हजारो असंघटित कामगार शहरात आहेत. त्यांच्यासाठी काही मोजक्या संघटना कार्यरत आहेत. त्यापैकी काशिनाथ नकाते हे कष्टकरी संघर्ष महासंघाच्या माध्यमातून चांगले काम करत आहेत.

कामगार चळवळ आणि लढे
साधारण १९७० नंतर कंपन्यांमध्ये कामगार संघटना अधिक मजबूत झाल्या. सुरुवातीच्या काळात नोकरी मिळाली, आपण स्थिर झालो. याचाच आनंद कामगारांना असायचा पण नंतर कामगार नेतृत्वाच्या प्रभावाने कामगारांनी आंदोलनाची भाषा सुरू केली. यातूनच नंतरच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये संप, मोर्चे, उत्पादन बंद ठेवणे. अशा अनेक घटना घडल्या आहेत. कंत्राटी कामगारांची संख्या वाढू लागली. नोकरी मिळविणे आणि ती टिकवणे ही बाबत महत्त्वाची ठरली.

महानगराची समृद्धी
पिंपरी-चिंचवड हे नव्याने विकसित झालेले शहर आहे. शहरात जागेची उपलब्धता आणि महापालिकेची उत्तम आर्थिक स्थिती यामुळे अनेक सुधारणा झाल्या आहेत. प्रशस्त रस्ते, सुंदर बागबगीचे, वृक्षारोपण, विविध नागरी सोयी सुविधा, मनोरंजन केंद्रे, शैक्षणिक संस्था. या सर्वामुळे शहराची समृद्धी वाढली आहे. सुरुवातीच्या काळात अनेक बाबतीत शहरातील नागरिकांना पुणे शहरावर अवलंबून राहावे लागत असे. इतकेच नाही तर नोकरी इकडे आणि वास्तव्य पुण्यात अशी स्थिती होती. आता नेमकी उलट स्थिती झाली आहे. निवासासाठी एक उत्तम शहर अशी पिंपरी चिंचवडची जडणघडण झाली आहे. गर्दी, प्रदूषण यांना कंटाळलेले अनेक पुणेकर पिंपरी चिंचवडला पसंती देत आहेत. इकडेच वास्तव्य करणे पसंत करत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर या भागात उद्योग धंदे आले. त्यांची भरभराट झाली. शहर विकसित झाले. महाराष्ट्राने जी प्रगती साधली. एक पुरोगामी विकसित राज्य अशी ओळख निर्माण केली. त्यामध्ये महत्त्वाचा पैलू हा औद्योगीकरणाचा आहे. राज्यातील मोठ-मोठे उद्योग आणि त्यात श्रम करणारे कामगार या दोन्ही बाबी महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक ठरले आहेत ‌.
भविष्यकाळात अधिक विकास साधायचा असेल तर उद्योगपूरक वातावरण ठेवणे, गुंतवणूकदारांना, कारखानदारांना सहकार्य करण्याची भूमिका स्थानिक भूमिपुत्रापासून शासनापर्यंत सर्वांनी घेणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक होऊन, महाराष्ट्राचा अधिक विकास आणि भरभराट होईल, असे वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com