महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’
महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’

महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’

ब्रिटिश राजवटीत मुंबई राज्य, मध्य प्रांत व हैदराबाद संस्थानात मराठी भाषिक विखुरलेले होते. स्वतंत्र भारतात भाषिक प्रांतरचनेवर आधारित राज्य निर्मितीला राजकीय पाठिंबा मिळू लागला. १२ मे १९४६ रोजी बेळगाव मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषिक राज्यासाठी वैचारिक मंथन झाले. १० ऑक्टोबर १९५५ रोजी पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक राज्यनिर्मितीसाठी राज्य पुनर्रचना आयोगाने पंडित नेहरू सरकारला शिफारस केली. एक मे १९६० रोजी महाराष्ट राज्य स्थापन झाले. एक समृद्ध महाराष्ट्र घडला.
- क्रांतिकुमार कडुलकर

दे शातील तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे आहे. ७२० किलोमीटर समुद्रकिनारा, ३६ जिल्हे, ३५८ तालुके, २७,८५५ ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समित्या, २७ महानगरपालिका, २८८ आमदार, ४८ खासदार, १९ राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रातील सहकार चळवळीमुळे एकूण १९६ साखर कारखान्यांचे मोठे जाळे आणि साखर उत्पादनात नंबर दोन महाराष्ट्र राज्य आहे. सहकार चळवळीमुळे ग्रामीण महाराष्ट्रात अर्थक्रांती झाली.

पायाभूत सुविधांचा विकास
महाविशाल, मध्यम, लघु उद्योगांची संख्या १७ लाख ४८ हजार आहे. महाराष्ट्रात धरणांची संख्या ३,२६४ सांगितली जाते. राज्यात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि बरेच राज्य महामार्ग आहेत. या सर्व महामार्गांची एकूण लांबी ३३,७०५ किलोमीटर आहे. महाराष्ट्रात १० कार्यरत विमानतळ आहेत. ज्यापैकी तीन आंतरराष्ट्रीय व सात देशांतर्गत विमानतळ आहेत. बाकी काही विमानतळ हे निर्माणाधीन आहेत. पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास झाला. उद्योगाची भरभराट झाली, औद्योगिक क्रांती झाली. आयटी पार्क हिंजवडीमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर गेला. कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगती उल्लेखनीय झाली.

मोठे व्यापारी राज्य
महाराष्ट्रात एकूण २३ राज्य विद्यापीठ (स्टेट युनिव्हर्सिटी) आहेत. त्याचे ११ सामान्य (एक महिलांसाठी), चार कृषी, तीन विधी, एक वैद्यकीय, एक तंत्रज्ञान, एक पशू व मत्स्यविज्ञान, एक मुक्त व एक संस्कृत असे वर्गीकरण आहे. महाराष्ट्रात ५८९ रेल्वे स्थानके आहेत. जागतिक दर्जाची विद्यापीठे, महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. २९५ कृषी बाजारसमित्यामार्फत अब्जावधी रुपयांची अन्नधान्य, डाळी, कडधान्ये, दूध, फळे, फुले, भाजीपाला याची दररोज उलढालीचे महाराष्ट्र हे मोठे व्यापारी राज्य आहे.

परदेशी उद्योजकांकडून प्राधान्य
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात मजुरी, किमान वेतनाचे दर सर्वात जास्त आहेत. त्यामुळे उत्तर भारत, किनारपट्टीतील व ईशान्य भारतातील राज्यातील लोक इथे रोजगारासाठी महाराष्ट्र पसंत करतात. आपले राज्य उद्योग, शेती, विज्ञान तंत्रज्ञान, अतिकुशल कामगार कर्मचारी, ४९ टक्के नागरिकीकरण इत्यादी सर्व क्षेत्रात प्रगत असे आहे. ब्रिटिश काळापासून टाटा, बिर्ला, बजाज, फिरोदिया, किर्लोस्कर, कल्याणी, वाडिया, गोदरेज, गरवारे या उद्योगपतींनी कारखानदारीसाठी महाराष्ट्र पसंत केला. भारत सरकारने औषध, दारूगोळा, टेक्स्टाईल, रिफायनरी, रेल्वे आदी बहुमूल्य क्षेत्रात सरकारी उद्योगाचा विस्तार महाराष्ट्रात केला. परदेशी कंपन्यांना महाराष्ट्र महत्त्वाचा असल्याने विविध परदेशी उद्योग महाराष्ट्रात प्रथम आले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा
दहा ऑक्टोबर १९५५ रोजी पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक राज्य निर्मितीसाठी नेहरू सरकारला शिफारस केली. राज्य पुनर्रचना समितीने ३० सप्टेंबर १९५५ ला एक रिपोर्ट सादर केला. त्यात गुजरात प्रदेश व मराठवाडा धरुन मुंबईचे द्विभाषिक करावे. मग गुजरात, महाराष्ट्र व मुंबई अशा तीन राज्यांच्या सूचना आल्या. सेनापती बापट, कम्युनिस्ट नेते कॉम्रेड एस. ए. डांगे, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आदींनी मुंबई, बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा बिगुल फुंकला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन संपूर्ण देशात व जगात गाजले, संयुक्त महाराष्ट्र समितीची सहा फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, हिंदू महासभा, सोशॅलिस्ट पार्टी व जनसंघ तसेच शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, डाव्या पुरोगामी कामगार संघटना, विद्यार्थी, युवक, महिला संघटना विशेषतः मुंबईतील गिरणी कामगार संघटना आणि त्यांचे लक्षावधी मराठी कामगार या आंदोलनात मुंबईसह महाराष्ट्र राज्यनिर्मिती झाली पाहिजे, ही भूमिका घेतली होती. एस. एम. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, अप्पा पेंडसे, तारा रेड्डी, गुलाबराव गणाचार्य, कुसुम रणदिवे, अशोक पडबिद्री, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे नेते होते. तसेच लालबावटा कलापथकाचे शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर बाळ पाटसकर आदी शाहीर पुरोगामी लेखक विचारवंतांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीसाठी वाणी, लेखणी खर्च करून महाराष्ट्र राज्य निर्मितीचे मोठे आंदोलन यशस्वी केले.

सर्वच क्षेत्राला चालना
महाराष्ट्रात तरुणांची लोकसंख्या किमान चार कोटी असेल. २०११ नंतर जनगणना झाली नाही. आता चौथी औद्योगिक क्रांती, वाणिज्य, कृषी, मेडिसिन, दळणवळण, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवाई वाहतूक क्षेत्रात सुरू झाली आहे. ‘मला पण इथे संधी मिळाली पाहिजे’ ही तरुणांची मोठी आकांक्षा परिपूर्ण करायची जबाबदारी सर्व राजकीय विचारांच्या नेत्यांची आहे. शाहू, फुले, आंबेडकर, वारकरी विचारांचा वारसा असलेला हा मंगल कलश चंद्र सूर्य असेपर्यंत सुमंगल राहो, हीच इच्छा.!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com