अतिक्रमणे, मैलापाण्याने व्यापले नाले

अतिक्रमणे, मैलापाण्याने व्यापले नाले

पिंपरी, ता. ३ : पिंपरी-चिंचवड शहरातील नैसर्गिक नाल्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमण होऊन नालेच गायब केले आहेत. तर काही ठिकाणी नाल्यात राडारोडा, कचरा, रसायनमिश्रित औद्योगिक सांडपाणी, मैला शुद्धीकरणाचे पाणी सोडून नाले मोठ्या प्रमाणात प्रदूषित केले जात आहेत. नाल्यातील हे प्रदूषित पाणी जाऊन पवना, मुळा, इंद्रायणी या नद्यांना मिळत आहे. त्यामुळे या नद्याही प्रदूषित होऊन त्यांची गटारे झाली आहेत. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचे शंभर टक्के शुद्धीकरण केल्याचा कितीही दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला तरी नाल्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी नद्यांना जाऊन मिळत आहे. त्यामुळे महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागरिक या सर्वांची हे नैसर्गिक नाले वाचविण्याची जबाबदारी असल्याचे ‘सकाळ’ टिमने केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे.

- रहाटणी, काळेवाडीत नालाच हडप
रहाटणी : रहाटणी, काळेवाडीत पवना नदीला मिळणारा नैसर्गिक नालाच हडप करण्यात आला आहे. नाल्याची जागा बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महापालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.
गोडांबे चौक १२ मीटर रस्त्याखालून नखाते वस्तीकडून वाहत येणारा हा नाला रहाटणी स्मशानभूमीजवळ नदीला मिळतो. हा नाला नदी पात्रात पसरट होता. मात्र, परिसरातील जमिनीला आलेले सोन्याचे भाव व येथून नदी समांतर १८ मीटर रुंद डीपी रस्ता गेल्याने हा नाला भराव टाकून अरुंद करण्यात आला.

तत्कालीन आयुक्तांची धडक कारवाई
या परिसरात मोठ मोठ्या सोसायट्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे हा नाला संबंधित बिल्डरांना त्रासदायक वाटत होता. त्यामुळे स्थानिक राजकीय पुढारी, महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठमोठे सिमेंटचे पाइप टाकून नदी पात्रापासून सुमारे दोनशे ते तीनशे मीटर नालाच बुजविण्यात आला होता. मात्र, तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश पाटील रहाटणीत पाहणी दौऱ्यास आले असता, त्यांच्या निर्दशनास ही बाब आली. त्यांनी तातडीने नाला खुला करण्याचे आदेश दिल्यानंतर नाला खुला करण्यात आला. तरीही या नाल्याला फ्लेक्स लावून झाकण्यात आले आहे.

काळेवाडीत नालाच बुजवला
काळेवाडी, नढेनगरमधील राधाकृष्ण मंदिराजवळ नैसर्गिक नाला बुजविण्यात आला आहे. काळेवाडीतून वाहत येत असलेल्या या नाल्यावर बांधकामे झाली आहेत. नदी पात्रालगत थोडासाच शिल्लक राहिलेला हा नाला नदीपात्राला पसरट होता. मात्र, या जागेवर राजकारण्यांचा डोळा असल्याने त्यांनी हळूहळू भराव टाकून नालाच बुजवला. एका स्थानिक माजी नगरसेविकेने याबाबत तक्रार करूनही महापालिका पर्यावरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

रहाटणी : तत्कालीन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानंतर खुला केलेला नाला.
काळेवाडी : नदी पात्रालगत बुजविण्यात आलेला नाला

फोटो आयडी : पीआयएम२३बी१५४०४, पीआयएम२३बी१५४०५

- पिंपळे गुरवमध्ये सफाई शून्य
पिंपळे गुरव : पिंपळे गुरव येथील एम. एस. काटे चौकातील सांडपाणी वाहून नेणारा नाल्यामध्ये मैलामिश्रित पाणी मिसळत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या नाल्यांची सफाई होणे आवश्यक असतानाही या महत्त्वाच्या कामाकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
नाल्यांमध्ये कचरा,प्लास्टिक, झाडाच्या फांद्या जागोजागी पडल्याने मैलामिश्रित पाणी तुंबले आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटून साथीचे रोग फैलावण्याचा धोका आहे. त्याचा त्रास येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. या नाल्यामध्ये कचरा साचला आहे. या कचऱ्यामुळे पाण्याची वाट अडली आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी सफाई न झाल्यास अनेक समस्या निर्माण होण्याची
शक्यता आहे. परंतु, महापालिका प्रशासनाच्या वतीने नाल्यांच्या साफसफाईबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही. संबंधित विभागाने तत्काळ योग्य ती कारवाई सुरू केली नाही तर नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होईल.

‘‘एम. एस. काटे चौकात असलेली बँसिलीओ सोसायटीचा मैलाशुध्दीकरण प्रकल्प (एसटीपी) बंद आहे. सदर ‘एसटीपी’ चे काम चालू आहे. त्यांचे मैलापाणी नाल्यांमध्ये येत आहे. गायत्री भेळ जवळ ड्रेनेज लाईन तुंबली आहे. सदरचे दुरुस्ती केल्यानंतर नाल्यातील मैलापाणी बंद होईल.’’
- प्रीती यादव, कनिष्ठ अभियंता जलनि:स्सरण विभाग
फोटो आयडी : पीएमजी२३बी००६८८

- वाकडमध्ये ओढ्यात सर्रास मैला
वाकड : येथील सुमारे दहा ते बारा सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यात विविध सोसायटींचे, बैठ्या घरांचे व लेबर कॅम्पचे मैला, सांडपाणी सोडल्याने हा ओढा त्रासदायक नाला झाला. त्यामुळे अस्वच्छता व उग्र दुर्गंधीचा त्रास काही भागातील रहिवाशांना होत आहे.
सातत्याने या ओढ्यात होणाऱ्या प्रदूषणामुळे त्याचे रूपांतर नाल्यात झाल्याची तक्रार येथील जुने ग्रामस्थ करतात. पनाश १-२, यश विस्टेरिया, इम्राल्ड १ ते ४, गणेश इम्पेरिया, शोनेस्ट टॉवर, प्रेस्टीन प्रो लाइफ, गोल्ड फिंगर अवेनियर इत्यादी सोसायटी जवळून वाहणाऱ्या या नाल्यामुळे दुर्गंधी अन डासांचा प्रादुर्भाव आहेच. याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हर फ्लो झाल्यावर काही सोसायटीत पाणी शिरते. तर काहींच्या पिण्याच्या टाकीत हे पाणी मिसळते, अशी तक्रार येथील रहिवाशांची आहे.

ठोस उपाययोजना नाहीच!
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पंधरा दिवसांपूर्वी आमदार अश्विनी जगताप यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नाल्याची पाहणी केली होती. अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत येथील मैलापाणी नाल्यात जाण्यापासून रोखावे, नाल्याची साफसफाई करून तो पूर्णपणे बंदिस्त करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. त्यानुसार ड्रेनेजचे पाणी व मैला थेट नाल्यात सोडणाऱ्या काही सोसायट्यांना नोटीस देण्यात आल्या. येथील काँक्रिट रस्त्याचे व ड्रेनेज वाहिन्यांचे काम सुरू आहे. मात्र, मैला पाणी अद्यापही नाल्यातून वाहतच आहे. यावर अद्याप तरी काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.

- दिघीतील नाले स्वच्छ
भोसरी : दिघीमध्ये सर्व ठिकाणी भूमिगत गटारे झाली आहेत. नैसर्गिक स्रोतांच्या दोन नाल्यामधील गाळ, कचरा महापालिकेच्या वतीने काढण्यात आल्याने सध्यातरी दिघीकरांचा पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची समस्येतून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.
दिघीतील दत्तगड, छत्रपती संभाजी महाराज चौक, शिवनगरी आदी मार्गाने जाऊन लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सीमाभिंतीमध्ये जाणारा नैसर्गिक नाला आहे. या नाल्याची पाहणी केली असता या नाल्यातील कचरा, गाळ काढल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे दिघीतील जुना जकात नाका, यमाईनगर, स्मशानभूमी आदी मार्गाने सीएमई सीमाभिंतीच्या आत जाणाऱ्या नाल्याचीही स्वच्छता केल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिघी : येथील शिवनगरीजवळील नैसर्गिक नाल्याची स्वच्छता करण्यात आली आहे.
फोटो आयडी : बीएचएस२३बी०१०४१

- चिखली परिसरात नालेसफाईचा अभाव
चिखली : कोणतीही प्रक्रिया केल्याशिवाय नाल्यातील पाणी सरळ नदीपात्रात मिसळत असल्याने चिखली परिसरातील नाल्यामुळे इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. मात्र; त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे या नाल्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त आहे. परिणामी पावसाळ्यात जाधववाडी, कुदळवाडी, चिखली गाव - मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती या भागाला दरवर्षी पुराचा धोका निर्माण होत असून, पावसाळा तोंडावर आला असतानाही पिंपरी चिंचवड महापालिके कडून कोणत्याही प्रकारची नालेसफाई अद्याप करण्यात आलेली नाही.
मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, कुदळवाडी परिसरात अनेक लहान-मोठे उद्योग आहेत. कुदळवाडी तसेच तळवडे परिसरात प्लास्टिक व इतर भंगार मालावर प्रक्रिया केली जाते. प्लास्टिक तसेच इतर भंगार स्वच्छ करण्यासाठी अनेक हानिकारक रसायनमिश्रीत पाण्याचा वापर केला जातो. मात्र, ते पाणी नाल्याद्वारे सरळ नदीपात्र सोडले जाते. त्याचबरोबर परिसरातून गटाराद्वारे येणारे सांडपाणीही प्रक्रियाविना नदीपात्रात जाते.
या परिसरात उंबरबांध, राम झरा तसेच कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातून येणारे नाले आहेत. मात्र; हे नाले अद्यापही साफ करण्यात आलेले नाहीत. तसेच महापालिकेकडून या नाल्याची कोणत्याही प्रकारची साफसफाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाल्यांवर अतिक्रमणाचे प्रमाण जास्त
अतिक्रमणामुळे चिखली परिसरात २० फूट रुंद असलेल्या नाल्यांना आता छोट्या गटारांवरचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रेड झोन परिसरात छोटी-मोठी घरे या नाल्यावर बांधण्यात आली आहेत. तर; रेड झोन हद्दीच्या बाहेर बांधकाम व्यावसायिकांनी या नाल्यावर अतिक्रमणे करून इमारती उभारल्या आहेत. राम झऱ्यावर तर खुद्द महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून अतिक्रमण केले आहे.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com