जुन्या सांगवीतील पुलाचे काम प्रगतिपथावर
पुण्याला नव्याने जोडणार ः इतर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार

जुन्या सांगवीतील पुलाचे काम प्रगतिपथावर पुण्याला नव्याने जोडणार ः इतर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार

रमेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी, ता. २० ः जुनी सांगवी येथे मुळा नदीवरील पुलाचे काम प्रगतिपथावर असून, येत्या आॅक्टोबरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे पुणे शहर परिसर जोडला जाणार असून, सांगवीच्या इतर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. या पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्यांच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

दक्षिण भाग गजबजणार
मुळा नदीवरील सांगवी बोपोडी पुलामुळे येथील मुळा नदी किनारा रस्त्याचा दक्षिण भाग गजबजणार आहे. एका बाजूला विकास कामे होत असताना येथील संगमनगर, जयमाला नगर, अभिनव नगर, पवारनगर आदी भागातील घरांना जोडरस्ता विकास कामाची बाधा पोचणार आहे. नगररचना विभाग व भूसंपादन विभागाकडून येथील जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेस सुरवात करण्यात आली आहे.

औंध रस्त्याच्या कृषी विभागाच्या बोटॅनिकल गार्डन हद्दीतील आणि पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. या नवीन पुलाकडे जाणाऱ्या वीस ते चाळीस फूट सांगवीतील शितोळे पेट्रोल पंप ते दत्त मठापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन विभागाकडून जागा संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत रहिवासी बाधितांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. यावर नागरिकांच्या हरकती सूचनांची कार्यवाही सुरू असल्याचे भूसंपादन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, सांगवी आदी मार्गे पूर्व पुण्याकडे स्टेशन येरवडा कॅम्प जाणारी सर्व वाहतूक विद्यापीठ औंध रस्ता सांगवीमार्गे जाईल. त्यामुळे सध्याचा वीस ते चाळीस फूट रुंद असलेला रस्ता अपुरा पडणार आहे.

‘‘गेल्या चाळीस वर्षांपासून कष्टकरी कामगारांच्या घरांचे वास्तव्य आहे. आहे तो जोडरस्ता वाहतुकीसाठी पुरेसा आहे. सध्या या रस्त्यावरून बससेवा व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. या रस्त्याबाबत हेतुपुरस्सर वारंवार प्लॅन बदलण्यात आलेला आहे. याआधी रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा प्लॅन होता. सध्या एका बाजूंच्या घरावर बाधा येणार असल्याने हे अन्यायकारक आहे. दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरण केल्यास रहिवाशांचे कमी नुकसान होऊन, राहती घरे वाचतील.
- दशरथ मोरे, बाधित नागरिक.

‘‘जागा मालकांना विश्वासात घेऊन, भूसंपादन प्रक्रिया करावी. येथील चाळीस ते पन्नास कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आहे. आमचे पूर्ण आयुष्य यासाठी खर्ची झालेले आहे.
- उत्तम शंकर शिंदे, बाधित रहिवासी

‘‘सांगवीतील या रस्त्याच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. जागा मालकांना भूसंपादन विभागाच्या पिंपरीतील कार्यालयाने नोटिसा दिलेल्या आहेत. भूसंपादनाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येईल.
-राजकुमार सूर्यवंशी, उप अभियंता नगर रचना विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका.

‘‘येथील नोटिफिकेशन झालेले आहे. नागरिकांच्या सुनावण्या सूचना हरकती घेण्यात आलेल्या आहेत. याबाबत दर निश्चितीचे मूल्यांकन करून विक्री व्यवहार दर निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करणे प्रस्तावित आहे.
-शुभांगी कुलकर्णी, भूसंपादन अधिकारी, भूसंपादन विभाग

फोटो- 15527

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com