जप्त फळांची परस्पर विक्री; पालिका अधिकाऱ्यांचाच ‘प्रताप’ ?

जप्त फळांची परस्पर विक्री; पालिका अधिकाऱ्यांचाच ‘प्रताप’ ?

रहाटणी, ता. ३ : महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत हातगाडीवरील जप्त केलेल्या फळांची
महापालिका अधिकाऱ्यांनीच परस्पर विक्री केली, असा आरोप फळ विक्रेत्याने केला आहे. त्याचे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये केले असल्याचा दावा त्याने केला. याबाबत महापालिका सहआयुक्तांकडे त्याने तक्रार दाखल केली आहे.
फळविक्रेते नागेश कदम यांनी सहआयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पिंपळे निलख येथील रक्षक चौकाजवळ थांबणाऱ्या फळांच्या हातगाड्यांवर २७ ऑक्टोबरला सायंकाळी पाचच्या सुमारास कारवाई केली. त्यावेळी कदम यांच्यासह त्यांचे बंधू व इतर दोघांच्या हातगाड्या फळांसहित टेंपोत टाकण्यात आल्या. यावेळी चारही जणांच्या गाडीवर सुमारे २५ ते ३० हजार रूपयांची फळे होती. फळांबाबत कदम यांनी विचारणा केली असता, जप्त केलेली फळे परत मिळत नाही. ती अजमेरा येथील ‘इस्कॉन’ संस्थेला दिली जातात, असे कदम यांना सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातून महापालिकेच्या एका वाहनात जप्त केलेली फळे भरण्यात आली. त्या गाडीचा कदम यांनी पाठलाग केला असता, ती फळे विविध ठिकाणी विकण्यात आली. याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कदम यांनी आपल्या मोबाईलमध्ये केले. ही गाडी अजमेरा या ठिकाणी गेलीच नाही. ती गाडी थेरगावात फिरत होती. कदम यांनी गाडीचा माग काढला. मात्र, ती वाहतूक कोंडीतून कुठे गेली, हे कदम यांना कळाले नाही.

जप्त केलेली फळे अनाथ आश्रमात जाणार आहेत. असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे, आम्ही जास्त विचार केला नाही. मात्र, महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, ही फळे अनाथ आश्रमात जाणार नाहीत. त्यामुळे आम्ही जप्त केलेल्या मालावर लक्ष ठेवले असता, सत्य बाहेर आले. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी इतर गाड्यांवर कारवाई केली. मात्र, त्यांचा माल परत दिला. संबंधित अधिकारी हा मद्यप्राशन करुन कारवाई करत असतो.
- नागेश कदम, तक्रारदार

क्षेत्रीय कार्यालयाच्या मार्फत रहदारीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांसह इतर अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. मात्र, जप्त केलेला माल कोणत्या कर्मचाऱ्यांनी विकला आहे. याची माहिती घेणार आहे. - अंकुश जाधव, सहायक आयुक्त तशा क्षेत्रीय अधिकारी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, मनपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com