नदी पात्रातही टन भर कचऱ्यांचे ढीग!

नदी पात्रातही टन भर कचऱ्यांचे ढीग!

जुनी सांगवी, ता. २५ ः जुनी सांगवीच्या उत्तर दक्षिण दोन्ही बाजूला मुळा व पवना नद्या आहेत. एकेकाळी नद्यांच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात होता. असे, ज्येष्ठ मंडळी सांगतात. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये नागरिकांकडून या नदीपात्रात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात वाढ झाली आहे. आज सद्यःस्थितीत दोन्ही नद्यांची गटारगंगा झाली आहे. आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होण्याची शक्यात टाळता येत नाही.


जुनी सांगवी आरोग्य विभागाच्यावतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सिमाभिंतीवरून पात्रात टाकलेला कचरा मानवी साखळी करून जवळपास सहा ते सात टन कचरा पात्राबाहेर काढण्यात आला. यामुळे विकासाच्या प्रवाहात नदी पात्रात पडणाऱ्या कचऱ्यामुळे ‘हीच का स्मार्ट सिटी’ असा प्रश्न सजग नागरिकांमधून विचारला जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने संयुक्त अभियान राबवत नदी पात्रात टाकला जाणारा कचरा रोखण्यात यावा. कचरा टाकणाऱ्या नागरिकांना समज देवून कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे.

डास किटकांचा उपद्रव वाढला ः
सांगवी, दापोडी परिसरात पवना मुळा नदी काठावरील रहिवासी भागात नदीपात्र अस्वच्छतेमुळे डास किटकांचा उपद्रव वाढला आहे. जुनी सांगवी येथील पवना नदी काठावरील गणपती विसर्जन घाट परिसर ते चंद्रमणीनगर या भागात सर्रास नदी संरक्षक सिमाभिंतीवरून नदीपात्रात कचरा टाकला जात आहे. सांगवी-दापोडी परिसरातील नदीकाठावर थाटण्यात आलेली व्यावसायिक पत्राशेड, भंगार मालाची दुकाने, रहिवासी भागातील कचऱ्यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. सांगवी आरोग्य विभागाच्यावतीने पवना नदीपात्रातील कचरा मानवी साखळी करून काढण्यात आला. विजय जगताप, संतोष कदम, बंडू जाधव, नीलेश जाधव, विशाल कांबळे, संभाजी गायकवाड, दशरथ नरसिंगे, किशोर मोटे, रोहित सुरवसे, महादेव जाधव, नारायण शितोळे, आदी कर्मचारी अधिकारी सहभागी होते.

कचऱ्याचे नियमित संकलन
जुनी सांगवी, दापोडी परिसरातील कचऱ्याचे संकलन कचरा गाडी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्यावतीने नियमित करण्यात येते असे आरोग्यविभागाकडून सांगण्यात येते. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात येते. नागरिकांकडून रस्त्याकडेला टाकलेला कचरा उचलला जातो. प्रत्येक गल्ल्यांमधून कचरा गाडीचे नियोजन करण्यात आलेले आहे. तांत्रिक अडचणी आल्यास स्थानिकांना तसे कळविण्यात येते. कचरा तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. सकाळी सात ते तीन पर्यंत कचरा संकलन करण्यात येतो. परिसरात कचरा संकलन करणाऱ्या आठ गाड्या आहेत. तर एकूण मनुष्यबळ ५४ आहे. हॉटेल वेस्ट कचरा, भाजी मंडई कचरा संकलनासाठी दुपारी चार ते रात्री अकरापर्यंत दोन गाड्याद्‍वारे कचरा संकलन करण्यात येते.

परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नदीपात्रात कचरा टाकल्याने प्रदूषणात वाढ होत आहे.
- अरुण शिंदे, ज्येष्ठ नागरिक

‘‘कचरा कुंडी मुक्त प्रभाग या उपक्रमांतर्गत जुनी सांगवी प्रभागात बऱ्यापैकी फरक पडला आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी अजूनही नागरिक कचरा उघड्यावर, नदीपात्रात टाकतात. स्वच्छता कर्मचारी, अधिकारी, यांच्याकडून नागरिकांना वेळोवेळी प्रबोधन करून कचरा गाडीतच टाकण्याचे आवाहन करण्यात येते. पवना नदीपात्रातील जवळपास सहा ते सात टन कचरा नदीपात्रातून वर काढण्यात आला आहे. नागरिकांनी नदी परिसराची स्वच्छता राखावी. कचरा गाडीतच द्यावा.’’
- वैशाली रणपिसे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, जुनी सांगवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com