शिंदेनगर रस्त्यावरील तुंबणाऱ्या पाण्याचा होणार निचरा

शिंदेनगर रस्त्यावरील तुंबणाऱ्या पाण्याचा होणार निचरा

जुनी सांगवी, ता. ५ ः येथील शिंदेनगर रस्ता व त्यास लागून असलेल्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करून ‘ह’ प्रभाग स्थापत्य विभागाकडून दुरुस्ती करण्यात आल्याने शिंदेनगर रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्यापासून रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
या कॉंक्रिट रस्त्याच्या प्रवेशालाच उंचवटा व कमी व्यासाच्या वाहिन्यांमुळे रहिवासी नागरिकांना पाणी तुंबण्याच्या प्रकारामुळे रहदारीसाठी अडचणी येत होत्या. याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत स्थापत्य विभागाकडे दुरुस्तीची मागणी केली होती. नवीन कॉंक्रिट रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने कामाबाबत नागरिकांमधून प्रश्न विचारले जात होते. याबाबत ‘सकाळ’मधून सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

पाण्याचा निचरा होत नसल्याने शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना येथून ये-जा करण्यासाठी अडचणी येत होत्या. मोठ्या पावसात पाणी तुंबल्याने स्थानिक रहिवाशांच्या घरातील स्वच्छतागृहे तुंबण्याच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थापत्य विभागाकडून पावसाची उसंत मिळताच येथील पाणी वाहिन्या वळवून मुख्य रस्त्याला जोडण्यात आल्या आहेत. याचबरोबर मुख्य डांबरी रस्त्याचे डांबर काढून रस्त्याची उंची कमी करून पुन्हा डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे पावसाचे पाणी व इतर सांडपाणी वाहिन्यांवर ताण येणार नसून, पाण्याचा व्यवस्थित निचरा होणार असल्याचे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले.

येथील कामाबाबत रहिवासी व प्रशांत शितोळे मित्र परिवाराच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. काम दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करण्यात यावे, अशी रहिवासी विकास लोले, अजय पाटील, विनय गायकवाड, सुहास वाघमोडे, अनंत इथापे, मंगेश काटे, रूपेश पुजारी आदींनी मागणी केली होती. या दुरुस्ती कामामुळे पाणी तुंबण्याच्या प्रकारातून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

‘‘येथील नागरिकांची पाणी तुंबण्याच्या प्रकारांमुळे होणारी अडचण लक्षात घेऊन तत्काळ दुरुस्ती करून येथील प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. येथील तुंबणाऱ्या पाण्याची सेवा वाहिनी मुख्य रस्त्याला जोडण्यात आली आहे. रहिवासी नागरिकांनी या कामात सहकार्य केले.
- सुनील दांगडे, उपअभियंता, स्थापत्य ‘ह’ प्रभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com