घरोघरी असावी ‘ज्ञानेश्वरी’ अन् ‘गाथा’ 
जयंत महाराज बोधले यांचा कानमंत्र; ‘सकाळ’ कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

घरोघरी असावी ‘ज्ञानेश्वरी’ अन् ‘गाथा’ जयंत महाराज बोधले यांचा कानमंत्र; ‘सकाळ’ कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

पिंपरी, ता. ३ : ‘ज्ञानेश्वरी’ व ‘गाथा’ प्रत्येक घरात असावी. हे ग्रंथ असलेल्या घरालाच घर म्हणावे. ज्यांना आळंदीला जाणे शक्य नाही, ज्यांना देहूला जाणे शक्य नाही, त्यांनी केवळ घरात असलेली ‘ज्ञानेश्वरी’ व ‘गाथा’ या ग्रंथाचे दर्शन घ्यावे. म्हणजे संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घडल्याचा भाव मिळतो,’’ असा विश्वास बोधले महाराज यांनी व्यक्त केला.
संत ज्ञानेश्वर माउली यांचा सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आणि आषाढी वारी यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. त्यातील दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेत बोधले महाराज बोलत होते. त्यांच्या हस्ते श्रीविठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमद्भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी व अभंगगाथा या ग्रंथाचे पूजन झाले. त्यानंतर त्यांची कीर्तन सेवा झाली. संत तुकाराम महाराज यांच्या,
ध्यानीं ध्यातां पंढरीराया।
मनासहित पालटे काया।।
तेथें बोला कांची उरी।
माझें मीपण झाला हरि।।
चित्तचैतन्यीं पडता मिठी।
दिसे हरिरूप अवघी सृष्टी।।
तुका म्हणे सांगो काय।
एकाएकीं वृत्ती हरिमय।।
या अभंगाचे निरूपण त्यांनी केले. बोधले महाराज म्हणाले, ‘‘परमात्मा एकच आहे. कोणी त्याला सगुण म्हणतात, तर कोणी निर्गुण म्हणतात. सर्व संतांनी त्याला सगुण-निर्गुण संबोधले आहे.’’ चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस फाउंडेशन महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत.

पिंपरी-चिंचवडकर नशीबवान
पिंपरी-चिंचवडचे नागरिक खूप नशीबवान आहेत. कारण, आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे निघतात, तेव्हा पहिले दर्शन तुम्हाला घडते, याची जाणीवही बोधले महाराज यांनी करून दिली.

‘सकाळ’ने वारी घडवली
‘‘आषाढी एकादशीनिमित्त सर्व संतांचे पालखी सोहळे जवळपास पंढरपूरजवळ पोचले आहेत. अशा या पावनपर्वाच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. ज्यांना वारीला जाणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी हा कीर्तन महोत्सव एकप्रकारे पंढरपूरची वारीच आहे. म्हणजे पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांना पंढरपूरची वारी घडवून आणली आहे.’’अशा शब्दांत जयंत महाराज बोधले यांनी ‘सकाळ’चे कौतुक केले.

रोहिणीताई माने-परांजपे यांचे आज कीर्तन
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी पाच वाजता पुणे येथील महिला कीर्तनकार रोहिणीताई माने-परांजपे यांची कीर्तन सेवा होईल.

महोत्सवाची उर्वरित रूपरेषा
शनिवारी (ता. ५) सायंकाळी पाच वाजता नेवासा येथील कीर्तनकार उद्धव महाराज मंडलिक यांची कीर्तन सेवा होईल. रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता पुणे येथील कीर्तनकार सचिन महाराज पवार यांच्या कीर्तन सेवेने महोत्सवाचा समारोप होईल.

सर्वांना विनामूल्य प्रवेश
आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

भाविक म्हणतात....
‘सकाळ’ने कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम खूपच आखीव रेखीव केला आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या उद्योग नगरीत व मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कीर्तन महोत्सवाचे, गेले चार-पाच वर्षे आयोजन करण्यात येते. त्यामुळे भाविक भक्तांना प्रत्यक्षात वारीला जाता आले नाही तरी वारी, पांडुरंग, त्याची भक्ती यांचा लाभ मिळत आहे. कीर्तन महोत्सवाचे गुंफलेले पहिले पुष्प पाहून आपण महोत्सवाचे शिवधनुष्य लीलया पेललेले दिसून आले. या कार्यक्रमाद्वारे आपण आपल्या संस्कृतीचा, वारकरी संप्रदायाचा वारसा जपल्याचे दिसून येते.
- सुप्रिया खासनीस, चिंचवड

‘सकाळ माध्यम समूहा’ने आषाढी वारी निमित्ताने कीर्तन महोत्सव सुरू केला आहे. पहिल्या दिवशीची सेवा रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांनी केली. पिंपरी-चिंचवड शहरातील वारकरी संप्रदायात विशेष योगदान देणाऱ्या मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सर्वांना ‘सकाळ’तर्फे महाराजांच्या उपस्थितीत सन्मानित केले. ‘सकाळ’च्या उपक्रमात जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. ‘सकाळ’चे कार्य सर्वत्र कौतुकास्पद आहे.
- विजय नखाते, भारत गौरव पुरस्काराने सन्मानित कुस्तीगीर, रहाटणी
....
फोटो ओळ
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात निरूपण करताना जयंत महाराज बोधले.
...
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात उपस्थित भाविक.
....
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड : ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सवात सन्मानित केलेले भाविक.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com