पालखी मार्गावर भक्ती अन् श्रद्धेची अनुभूती
पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ : आळंदी ते पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचा मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. महापालिकेने या मार्गावर चोविसावाडी ते दिघी दरम्यान साधारण बारा किलोमीटर अंतरावर जणू वारकरी सोहळाच उभारला आहे. आठ पदरी प्रशस्त मार्गावर ठिकठिकाणी संतांचे विचार, पालखी सोहळ्याचे महत्त्व, वारकरी संप्रदायाच्या पाऊलखुणा बघायला मिळतात. प्रवासादरम्यान त्या दृष्टीस पडताच नकळतपणे हात जोडले जाऊन नमस्कार केला जातो आणि भक्ती आणि श्रद्धेची अनुभूती येते.
आळंदी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम आळंदीतच असतो. दुसऱ्या दिवशी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो, तेव्हा पहिला विसावा पिंपरी-चिंचवड शहरातील वडमुखवाडी (चऱ्होली) येथील थोरल्या पादुका मंदिरात असतो. तत्पूर्वी आळंदी जवळील काळे कॉलनी चोविसावाडी (चऱ्होली) येथे पिंपरी-चिंचवड शहरात पालखीचा प्रवेश होतो. तर पालखीचा दुपारचा विसावा दिघी येथील श्री विठ्ठल मंदिरात असतो. त्यानंतर बोपखेल फाटा येथून पालखी पुण्यात प्रवेश करते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने काळे कॉलनी ते दिघी दरम्यान ठिकठिकाणी वारी, वारकरी, संतांच्या आठवणी जागवल्या असून भक्तीचा मळा फुलवला आहे. पालखी मार्गाने प्रवास करताना वारकरी संप्रदायाच्या पाऊलखुणा दृष्टीस पडतात आणि प्रत्येकाचे हात जुळले जाऊन नमस्कारही घडतो.
अशा आहेत वारीच्या पाऊलखुणा
- काटे कॉलनी येथे संत ज्ञानेश्वर माउली धाकट्या पादुका मंदिर येथे परतीच्या प्रवासात माउलींची पालखी थांबते
- काळे कॉलनी चोविसावाडी येथे लोखंडी पट्ट्या वापरून माउलींचे मुखकमल शिल्प साकारले आहे
- वडमुखवाडी चौकाजवळ भव्य चौथऱ्यावर वारकरी शिल्प साकारले आहे
- वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्वर माउली यांचे थोरल्या पादुका मंदिर आहे, मंदिराचा गाभारा आणि सभा मंडप प्रशस्त आहे. माउलींच्या पालखीचा पहिला विसावा मंदिरात असतो
- थोरल्या पादुका मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे. त्याच्या दोन्ही प्रवेशद्वारांना संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज प्रवेशद्वार अशी नावे दिली आहेत
- थोरल्या पादुका मंदिरासमोर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचा सोहळा साकारला आहे, त्यात संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्यासह वारकरी संतांच्या मूर्ती आहेत
- संत भेट सोहळ्याच्या समोर संतश्रृष्टी उद्यान साकारले आहे. त्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित म्युरल्स असून प्रत्येक प्रसंगाचे माहिती फलक लावले आहेत
- थोरल्या पादुका मंदिर व संत सृष्टीच्या दोन्ही बाजूला पालखी मार्ग आहे, त्याच्या संरक्षक कठड्यावर वारकरी चित्र लोखंडी सांगाड्यात कोरले आहे. यात तुळशी वृंदावन घेतलेली महिला, टाळकरी, विणेकरी, पताकाधारी वारकरी यांचा समावेश आहे
- मॅग्झीन चौकात पालखी सोहळ्याचा देखावा साकारला आहे
- दिघी गावठाण चौकात श्री विठ्ठल मंदिरासमोर टाळ, मृदंग, वीणा, तुळस यांचे शिल्प पालखी मार्गाच्या मधोमध आहे
PNE25V28777, PNE25V28775
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.