गणेशमूर्ती घडविण्याची लगबग सुरू
जुनी सांगवी, ता.५ ः गणेशोत्सव महिन्याभरावर आला असून जुनी सांगवीतील कुंभारवाड्यात गणेश मूर्ती तयार करण्याच्या कारखान्यांमधून कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. कच्चा माल, रंग, वाहतुकीचे भाडे वाढल्याने यंदा गणेशमूर्तीच्या किंमती पन्नास ते शंभर रुपयांनी वाढणार असल्याचे मूर्तिकार व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
जुनी सांगवीच्या कुंभारवाड्यातील गणेशमूर्तींना पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामधून मागणी असते. सहा महिन्यांपूर्वीपासून व्यावसायिक कलाकार तयार करण्याचे काम करतात. त्यानंतर मूर्तींना रंगकाम व सजावटीसाठी कारागिरांची अहोरात्र लगबग सुरू असते. बहुतांश ठिकाणी पारंपरिक बाप्पाच्या मूर्तींची हव्या तशा मूर्तींची आगाऊ ऑर्डर दिली जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार कुंभारवाड्यात मूर्ती तयार करून दिल्या जातात. ऑर्डरप्रमाणे उंचीनुसार व कलाकुसरीच्या मूर्ती तयार केल्या जात असल्याने येथील मूर्तींना मोठी मागणी असते.
शाडू मूर्तींच्या मागणीत वाढ
पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींना मोठी मागणी वाढली आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी कलाकार मंडळींचाही शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यास कल पाहायला मिळत आहे. अर्थात शाडूच्या मूर्ती प्लास्टर पॅरिस मूर्तींपेक्षा महाग आहेत. यावर्षी अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्याने इतर वस्तूंमध्येही दरवाढ झाली आहे. त्यामुळे, श्रींच्या मूर्तीही त्याला अपवाद राहणार नाहीत.
विविध आकारांतील आकर्षक मूर्ती
- कोळी पॅटर्न, नाखवा होडीतील गणेश, पक्षी-प्राण्यांवर विराजित मूर्ती, पारंपरिक पुणेरी गणपती, बाबू गेनू, जिलब्या मारुती, तुळशीबाग, कसबा, दगडूशेठ, मंडई आणि लालबागचा गणपती याचबरोबर विविध रूपांतील हुबेहूब मूर्ती कलाकार घडवत आहेत. याखेरीज, पेणच्या शाडू मातीच्या मूर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधील फेटाधारी जय मल्हार, जय हनुमान, बाल गणेश, तांडव अवतार, शिव अवतार अशा अनेक मूर्तींना मुलांकडून घरगुती गणेशोत्सवासाठी विशेष मागणी असते. यावर्षी नव्याने ब्लॅक ॲण्ड व्हाईट संगमरवरी भास असणारी आकर्षक रंगसंगतीच्या मूर्तीला विशेष पसंती देण्यात येत आहे.
गणपती मूर्ती बनविण्याचे काम नियमित सुरू असते. कोऱ्या मूर्तींवर रंगकाम दोन महिने आधी सुरू करण्यात येते. परिसरातील नागरिक दोन ते तीन महिन्यांपासून ऑर्डर देतात. यात सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती उंचीनुसार तयार करून दिल्या जातात.
- कपिल कुंभार, विक्रेता, जुनी सांगवी
PIM25B20056
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.