पंढरपूरच्या वारीतून लोकशिक्षण

पंढरपूरच्या वारीतून लोकशिक्षण

Published on

पिंपरी, ता. ५ : ‘‘पंढरपूरच्या वारीतून लोकशिक्षण होत आहे. ही श्रद्धायुक्त भक्ती आहे. इथे अंधश्रद्धेला थारा नाही,'''' असा विश्वास नेवासा येथील ज्येष्ठ कीर्तनकार उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केला. वारीने आम्हाला संघटन कौशल्य दिले आहे. संघटन ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संत ज्ञानेश्वर माउली यांचा सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आणि आषाढी वारीनिमित्त सकाळ माध्यम समूहातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. त्यातील कीर्तन सेवेत ते बोलत होते. त्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमद् भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी व अभंगगाथा या ग्रंथांचे पूजन झाले. त्यानंतर त्यांची कीर्तन सेवा झाली. संत ज्ञानेश्वर माउली यांच्या,
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा ।
विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥
वेधलें वो मन तयाचियां गुणीं ।
क्षणभर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे ॥
पौर्णिमेचें चांदिणे क्षणक्षणा होय उणें ।
तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलचि पुरे ।
चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥
या अभंगाचे निरूपण त्यांनी केले.
उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वरी ही आमची ओळख आहे. ‘माझ्या मऱ्हाटीचिये नगरी’ म्हणत मराठीचा गौरव माउलींनी केला आहे. संत जनाबाई म्हणतात, ‘वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी’ इतका श्रेष्ठ हा ग्रंथ आहे. त्याची जागा डोक्यावर ठेवण्याची आहे. शास्त्र, वेद, रामायण, महाभारताचा विचार संतांनी सोप्या शब्दांत आपल्याला दिला आहे. त्यातून सतत समाज प्रबोधन होत राहील.’’ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संत विचार मार्गदर्शक आहेत. त्यामुळेच समाज सुखी, समाधानी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन महोत्सवाचे सहप्रायोजक आहेत.

‘सकाळ’कडून संस्कृतीची जोपासना
सकाळ माध्यम समूहाने प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करून साधनेची पर्वणी आणली आहे. सद्य:स्थितीत समाजाला दिशा देण्यासाठी सदविचारांची पेरणी करणे आवश्यक आहे. ‘सकाळ’ हे काम करत आहे. परवा मी ‘सकाळ’ वाचत असताना ‘कोडं डोकं’ ही पुरवणी वाचली. त्यामध्ये वारी संदर्भात कोडं होते. त्यात वारी आणि संतांसंबंधित प्रश्न विचारलेले होते. ही अफलातून कल्पना आहे. कारण, जीवनातील ‘कोडं’ सोडविण्यासाठी ‘डोकं’ ठिकाणावर ठेवले पाहिजे, हे तत्त्व ‘सकाळ’ ला कळले आहे. महाराष्ट्रातच नव्हे; तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे ‘सकाळ’ वैचारिक जागृती करत आहे. महाराष्ट्र संस्कृतीसाठी हे मोठे काम आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही ढोलकी, तुणतुण्यापुरती मर्यादित नाही, ती लोककला आहे. त्याचा आदर आहेच. पण, टाळ आणि मृदंगाची आमची संस्कृती आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा उगमच संतांच्या विचारातून झाला आहे. ती जोपासण्याचे काम ‘सकाळ’ करत आहे. ज्यांना वारीला जाणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी ‘सकाळ’ने इथे कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून पंढरपूरच उभे केले आहे, अशा शब्दांत मंडलिक महाराज यांनी ‘सकाळ’ चे कौतुक केले.

आज सकाळी नऊ वाजता सेवा
आषाढी एकादशीनिमित्त रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता पुणे येथील कीर्तनकार सचिन महाराज पवार यांच्या कीर्तन सेवेने महोत्सवाचा समारोप होईल.

सर्वांना विनामूल्य प्रवेश
आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’ ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

भाविक म्हणतात....
‘सकाळ’तर्फे आयोजित कीर्तन सोहळा हा आषाढी एकादशीनिमित्त एक आनंद सोहळा आहे. शुक्रवारी कीर्तनाने खूप उंची गाठली. बसायला जागा नव्हती म्हणून भाविक खाली बसले. वारकरी संप्रदायातील लोकांना मानपान खुर्ची लागत नाही. थिएटरमध्येही ते खाली बसून कीर्तन ऐकू शकतात, ही वारकरी संप्रदायाची खरी ताकद आहे.
- विद्या अरुण काशीद, इंदोरी, ता. मावळ

समाजमनाची स्पंदने जाणत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कीर्तन सोहळा एक अलौकिक अनुभूती आहे. समाजातील विरुपे आणि विसंगती वाढत असताना ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ मधून असे उपक्रम आशेचे किरण वाटतात. ‘सकाळ’ चा हा आगळा वेगळा उपक्रम अद्वितीय आहे. भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवत प्रबोधन करणारा हा कीर्तन महोत्सव आहे.
- राजेंद्र घावटे, संभाजीनगर, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com