आजारी, मोकाट जनावरांचा रहदारीस अडथळा
जुनी सांगवी, ता.६ ः जुनी सांगवी, पिंपळे निलख, दापोडी व उपनगरांत मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आजारी, जखमी मोकाट जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसत असल्याने त्यांचा रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे, त्यांची रवानगी निवारा केंद्रात केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपळे निलख येथील पिंपळे निलख बालेवाडी फाटा, विशालनगर, कै. शहीद अशोक कामटे उद्यान, स्मशानभूमी रस्ता, रक्षक चौक पिंपळे निलख मुख्य रस्ता, क्रांतीनगर मुख्य रस्ता इत्यादी भागांत मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. जास्त वयाची, भाकड आणि आजारी जनावरांची देखभाल करण्याऐवजी जनावरांचे मालक त्यांना रस्त्यांवर मोकळे सोडत आहेत. त्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून मोकाट जनावरांचे लसीकरण सुरू असले तरी त्यांना कायमस्वरुपी चारा, पाणी व निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्राणीमित्र व सजग नागरिकांमधून होत आहे.
निवाऱ्याची गरज
शहरात गाई, म्हशी, बैल, घोडे, उंट यासह मोकाट फिरणारी व पाळीव जनावरांची संख्या सुमारे दोन हजार ४०० इतकी आहे. जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने याचबरोबर आजारी, जखमी जनावरांना निवारा नसल्याने परिणामी ती रस्त्यावर येतात. त्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे.
लम्पीच्या प्रादुर्भावात वाढ
महापालिका स्तरावर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दूषित चारा-पाणी यामुळे हा आजार जोरात फैलावत आहे. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवण्याचा पर्याय नसल्याने मोकाट जनावरांच्या कळपामध्ये लम्पी आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचबरोबर मोकाट जनावरांचा सार्वजनिक रस्ते, चौक परिसरात वावर वाढला असल्यामुळे परिणामी वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होतो. अपघातामुळे माणसांसह जनावरेही जखमी होतात. त्यावर उपाय म्हणून मोकाट जनावरांना कायमस्वरुपी निवारा उपलब्ध करून दिला जावा.
- माणिक भांडे, प्राणी मित्र
चारा, पाण्याच्या शोधात मोकाट जनावरांचा सार्वजनिक ठिकाणी वावर असतो. छोटे बछडे, वय झालेली जखमी जनावरे त्यात असतात. त्यांचा चारा, पाणी आणि आरोग्याचा प्रश्न सोडवून निवारा केंद्रात त्यांचे स्थलांतर करावे.
- सीमा साठे, नागरिक
चिखली येथे मोकाट जनावरांसाठी निवारा केंद्राचे काम प्रस्तावित आहे. मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरात लसीकरणाचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका आरोग्य विभागाचे पथक नियमित कार्यान्वित आहे.
- संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग
PIM25B20067
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.