रक्षक चौकाला कोंडीचे ग्रहण
जुनी सांगवी ः सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावर पिंपळे निलख येथील रक्षक चौकात भुयारी मार्गासाठी खोदकाम केले आहे. उड्डाणपुलाचेही काम सुरू असल्यामुळे चौकात रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. परिणामी रस्ता रहदारीसाठी कमी पडत आहे. पिंपळे निलखकडून येणारी वाहतूक रक्षक चौकात एकत्र येत असल्याने नेहमीच चौकात कोंडी होते.
कोंडीची कारणे
- पिंपळे निलखकडून जुनी सांगवी औंधकडे मोठा वळसा (यु टर्न) घालून जावे लागते
- वाहनांची गर्दी वाढल्याने विशालनगर चौक, बालेवाडी फाटा चौकापर्यंत रांगा लागतात
- सांगवी फाटा, रक्षकचौक, जिल्हा रुग्णालय भागात खासगी बसप्रवासी थांबे
- जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे कोंडीत भर
उपाययोजना
- पिंपळे निलखकडून येणाऱ्या वाहनांसाठी चौकातील कोपऱ्यावर रस्ता रुंद करावा
- जड वाहनांना दिवसा प्रतिबंध करावा
- खासगी बस प्रवासी थांबे इतरत्र हलविण्यात यावेत किंवा प्रतिबंध घालावा
- भुयारी मार्ग व उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक
पिंपळे निलखकडून येणारी जड वाहने, सांगवी-औंधकडे मोठा वळसा यूटर्न घेणारी वाहने तसेच बेशिस्त वाहनांमुळे कोंडीत भर पडत आहे. याचबरोबर रात्री खासगी बस प्रवासी वाहतूक थांबे यांना प्रतिबंध करून इतरत्र हलविण्यात यावेत.
- विकास भागवत, नागरिक