औपचारिकपेक्षा पारंपरिक शिक्षणही महत्त्वाचे : प्रभुणे
पिंपरी, ता. ११ : ''औपचारिक शिक्षणापेक्षा पारंपरिक शिक्षण महत्त्वाचे असते!'' असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक, साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढले.
चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे कलारंजन प्रतिष्ठान आयोजित गुरुगौरव पुरस्कार समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालयाचे सेवानिवृत्त उपसंचालक बाबुराव हंद्राळे अध्यक्षस्थानी होते; तसेच सेवानिवृत्त उपप्राचार्या सुरेखा कटारिया, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे जगन्नाथ नेरकर, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्यवाह शिरीश पडवळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पांडुरंग भुजबळ, दिलीप ससाणे, संपत पोटघन यांना गुरुगौरव विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सावता गिड्डे, श्यामल दौंडकर, करुणा परबत, शुभांगी राजे, प्रज्ञा देशपांडे, हर्षाली टाव्हरे, कृतिका काळे आणि संगीता गिरी यांना सन्मानित करण्यात आले.
प्रभुणे म्हणाले, ‘‘प्राचीन भारत हा ज्ञानसंपन्न होता. त्यामुळे जगातील विविध देशांमधून ज्ञान संपादन करण्यासाठी इथल्या अनेक विद्यापीठांमध्ये असंख्य विद्यार्थी येत असत. साहजिकच गुरुपूजनाची परंपरादेखील आपल्या देशात हजारो वर्षांपासून आहे. परकीय आक्रमणांमुळे विद्यापीठे नष्ट झाल्यावर संतांनी ज्ञानदानाची परंपरा जोपासली; परंतु ब्रिटिश काळात देश मानसिक गुलामगिरीत जखडला गेला. जोपर्यंत आपण त्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत भारत विश्वगुरू पदापर्यंत पोहोचू शकत नाही.’’
श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारार्थींच्या वतीने पांडुरंग भुजबळ आणि प्रज्ञा देशपांडे यांनी प्रातिनिधिक मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. ‘‘शिष्य हा गुरूपेक्षाही मोठा झाला पाहिजे, अशा समर्पित भावनेतून गुरुजनांनी अध्यापन करावे’’ असे मार्गदर्शन हंद्राळे यांनी केले.
पूनम गुजर, शांता गायकवाड आणि गुरुकुलम्मधील शिक्षकांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन, शिरीश पडवळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.