तुकोबारायांच्या पालखी स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज
पिंपरी, ता. १८ ः आषाढी वारीनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला गेलेला संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर आहे. शनिवारी (ता. १९) सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होत असून, पिंपरीगावातील भैरवनाथ मंदिरात मुक्कामी असेल. रविवारी (ता. २०) सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होईल. तत्पूर्वी चिंचवडगावात संत तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांचे पालखी रथांची भेट होईल. त्यामुळे संत दर्शनाचा लाभ पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे.
आषाढी एकादशीला लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरहून देहूकडे निघाला आहे. शनिवारी (ता. १९) सकाळी पुण्यातून निघालेल्या पालखी सोहळ्याचे दापोडी येथून पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होईल. फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा, खराळवाडी मार्गे सोहळा पिंपरीगावात मुक्कामी पोहोचेल. तत्पूर्वी महात्मा फुले महाविद्यालयाजवळील चौकात महापालिकेतर्फे पालखीचे स्वागत होईल. शिवाय, पालखी मार्गावर गोकूळ हॉटेल चौक, पिंपरी कॅम्प या ठिकाणीही नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून स्वागत केले जाईल. सोहळ्यातील वारकऱ्यांना फराळाचे वाटप केले जाईल. याअनुषंगाने पालखी मार्गावर स्वच्छता, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय मदत केंद्रे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत इतर संबंधित सेवा सुविधा महापालिका पुरविणार आहे.
उद्या आळंदीकडे मार्गस्थ
पिंपरीतील मुक्काम आटोपून पालखी सोहळा रविवारी (ता. २०) पिंपरी लिंकरस्त्याने चिंचवडगावात पोहोचेल. येथे श्रीमन् महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथ व पादुका भेटीचा सोहळा होईल. त्यानंतर चिंचवड स्टेशन, केएसबी चौक, लांडेवाडी, भोसरी, मॅगझीन चौक, थोरल्या पादुका, धाकट्या पादुका मार्गे आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी पोहोचेल.
सोमवारी देहूत पोहोचणार
आळंदी येथील मुक्कामानंतर सोमवारी (ता. २१) संत तुकाराम महाराज पालखी देहूफाटा, डुडुळगाव, मोशी, चिखली, तळवडे, विठ्ठलवाडी मार्गे जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात पोहोचेल.
---
भोसरी-मॅगझीन चौकमार्गे आळंदी
देहू ः संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १९) सायंकाळी सात वाजता पिंपरीगावात पोहोचेल. रविवारी (ता. २०) सकाळी सहा वाजता पिंपरी येथून चिंचवडकडे मार्गस्थ होईल. चिंचवड येथे साडेआठ वाजेपर्यंत पालखी सोहळ्याची पहिली विश्रांती असेल. चिंचवड स्टेशन मार्गे सकाळी १० वाजता केएसबी चौकात पालखी पोहोचेल. टेल्को रस्त्याने लांडेवाडी भोसरी येथील पटांगणात साडेअकरा वाजता पालखीचे आगमन होईल. दुपारी पालखी सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होईल. मॅगझीन चौकात दुपारी दोन वाजता सोहळा असेल. साधारणपणे अडीच वाजता पालखी वडमुखवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराजवळ असेल. सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळ्याचे आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आगमन होईल, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.