स्वच्छतेचा अग्रक्रम राखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
- पीतांबर लोहार
कें द्र सरकारने २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये देशातील बहुतांश मोठी शहरे सहभागी होत आहेत. पिंपरी-चिंचवडही सुरुवातीपासून सहभागी झाले आहे. २०१५ मध्ये केलेल्या शहरांच्या परीक्षणाचा निकाल २०१६ मध्ये जाहीर झाला. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने नववा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे देशात पहिल्या दहा शहरांत समावेश झाल्याने महापालिका अधिकाऱ्यांसह नागरिकांची अभिमानाने ऊर भरून आला होता. पण, २०१६ च्या सर्वेक्षणात शहरांची संख्या वाढली आणि देशपातळीवर शहराची प्रतिमा घसरली. कारण २०१७ मध्ये जाहीर झालेल्या निकालात तब्बल ७२ व्या क्रमांकावर शहर फेकल्या गेले आणि खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने सुधारणा करण्यास सुरुवात केली. इंदूर दौरा करून ‘स्वच्छतेचा इंदूर पॅटर्न’ राबवायचे ठरवले. पण, फार सुधारणा दृष्टीस पडत नव्हती. प्रयत्न मात्र सुरू होते. त्याला यशही येताना दिसत होते. कारण, २०१७ मध्ये असलेला ७२ वा क्रमांक २०१८ मध्ये ४३ वर आला. २०१९ मध्ये थोडी घसरण होऊन ५२ वर गेला. त्यातून धडा घेत जोरदार मुसंडी मारत २०२० मध्ये २४ वा क्रमांक पटकावला. कोरोना काळात बऱ्यापैकी सुधारणा होऊन २०२१ व २०२२ मध्ये १९ व्या क्रमांकावर उचल खाल्ली. २०२३ मध्ये देशात पहिल्या दहा शहरात पण, दहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यात आणखी सुधारणा करत २०२४ च्या सर्वेक्षणात लगतच्या पुण्याला मागे टाकत देशात सातवे आणि राज्यात प्रथमच प्रथम स्थान पटकावले. त्याबद्दल केंद्र सरकारने गौरवही केला. ‘सेव्हन स्टार गार्बेज फ्री सिटी’ व ‘वॉटर प्लस’ मानांकन मिळविले. हे सर्व शहराची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थापन यामुळे शक्य झाले. कारण, कचरा मुक्त शहर महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावण्याचे कार्य नियमितपणे केले जात असल्याचे आणि घराघरांतून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात असल्याचे सिद्ध झाले. शिवाय, संकलित कचऱ्याचे कंपोस्टिंग, रिसायकलिंग, बायोगॅस व वीजनिर्मिती आणि पुनर्वापर केला जात असल्याचे द्योतक आहे. स्वच्छ सर्वेक्षण यशस्वीतेमध्ये महापालिकेबरोबरच शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा व उद्योगांचे मोठे योगदान आहे. नागरिकांनी नियमित कचरा वर्गीकरण, प्लॅस्टिकचा कमी वापर, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. यासाठी शहर स्वच्छतेसाठी झटणारा प्रत्येक नागरिक, सफाई कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था अभिनंदनास पात्र आहेत. पण, आजही शहरात काही नाठाळ आणि प्रशासनात कामचुकार मंडळी बघायला मिळते. त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शब्दांत, ‘नाताळाच्या माथी हाणू काठी’ असेच वर्तन शहर अस्वच्छ व विद्रूपकरणाऱ्यांबाबत ठेवायला हवे. महापालिकेने त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. शहर विद्रूप व अस्वच्छ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. गेल्या वर्षभरात सात हजार २१४ जणांकडून तब्बल एक कोटी ४८ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरीही काही महाभाग सुधारायला तयार नाहीत. ‘दंड भरू पण, घाण करू’ किंवा ‘आम्ही नाही सुधारणार’ अशीच काहींची मानसिकता दिसते. ती सुधारण्यासाठी दंडात्मक कारवाईबरोबर प्रबोधनाचीही गरज आहे. कारण स्वच्छतेचा राज्यातील अव्वल क्रमांक कायम राखण्यासाठी आणि देशातही अव्वल क्रमांक पटकविण्यासाठी स्वच्छ मनांची निरोगी मानसिकता आणि लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.