अवजड वाहनांची रहदारीमुळे अपघाताचा धोका
जुनी सांगवी, ता.५ ः जुनी सांगवी, दापोडी परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी, दुतर्फा पार्किंग आणि अवजड वाहनांची रहदारी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ते मोठे असूनही दुतर्फा पार्किंगमुळे रहदारीसाठी अपुरे पडत आहेत. त्यातच अवजड ट्रक, टेम्पो, डंपर आणि खासगी चारचाकी वाहनांची रहदारी होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
सांगवी परिसरातील मुख्य रस्ते पार्किंगच्या विळख्यात अडकल्याने मोठे रस्ते अरुंद होऊन रहदारीला मार्गच राहत नाही. त्यामुळे अपघात घडणे तसेच वाद निर्माण होणे हे रोजचेच झाले आहे. विशेषतः सकाळी व संध्याकाळी शाळा-महाविद्यालये व कार्यालयांच्या वेळेस हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो. दापोडी ते पवना नदी किनारा रस्ता, संविधान चौक ते सांगवी फाटा रस्ता, महाराष्ट्र बॅंक चौक ते औंध रस्ता या संविधान चौक, माहेश्वरी चौक, दत्त आश्रम रस्ता, ममतानगर या भागात दुतर्फा पार्किंगमुळे रस्ते रहदारीसाठी अपुरे पडत आहेत.
अवजड वाहनांचा त्रास असह्य
बऱ्याचदा बाहेरील भागांहून येणाऱ्या ट्रक, डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली अशा अवजड वाहनांमुळे रहदारीचा वेग मंदावतो. रस्त्यांवर खड्डे पडतात. हवा आणि ध्वनी प्रदूषणही वाढते. रात्रीच्यावेळेसही काही अवजड वाहनचालक बिनधास्तपणे धाव घेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रहिवासी भागांत अवजड वाहनांची प्रवेश बंदी करावी अशी मागणी स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, नागरिकांमधून होत आहे.
सांगवी परिसरातील मुख्य रस्ते मोठे असूनही केवळ दुतर्फा पार्किंगमुळे कोंडी होत आहे. अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
- तृप्ती कांबळे, आरंभ महिला प्रतिष्ठान
सकाळी आठ ते बारा, सायंकाळी चार ते नऊ यावेळेत जड वाहनांना प्रवेश बंदी आहे. याचबरोबर जड वाहने व दुतर्फा पार्किंगबाबत नियमित कारवाई सुरू आहे. नागरिकांच्या मागणीनुसार कारवाई व्यापक करून दुतर्फा पार्किंग पूर्णपणे बंद करून सम-विषम पार्किंगचा नियम लागू करण्यात येईल.
- प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग सांगवी
PIM25B20198